मुंबई : 'ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट असोसिएशन'ने देशव्यापी संप पुकारला आहे. त्यामुळे 10 एप्रिलपासून मालवाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे. देशभरातील सुमारे 60 लाखांहून अधिक मालवाहतूक करणारी वाहनं रस्त्यावर धावणार नाहीत.


देशव्यापी संपात नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएननेही सहभाग घेतला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील 15 हजारांहून अधिक वाहनं रस्त्यावर धावताना दिसणार नाहीत.

विमा कंपन्यांकडून करण्यात आलेली थर्डपार्टी इन्शुरन्समधील 40 टक्के दरवाढ मागे घ्यावी, पथकर नाके हटवावे अशा प्रमुख मागण्या वाहतूकदार संघटनेच्या आहेत.

हैदराबादमध्ये 3 एप्रिलला आयआरडीएसोबत झालेल्या बैठकीत इन्शुरन्सची वाढलेली रक्कम कमी करण्यासंबंधी कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट असोसिएशनने 10 एप्रिलपासून देशव्यापी संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे.

संप कालावधीत जिल्हाभरातील 15 हजारांहून अधिक वाहनं मालवाहतूक करणार नसल्याने संपाबाबत वेळीच तोडगा न निघाल्यास नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण देशभरात मालवाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे.