Vasai Crime News : एटीएम मशीनमध्ये स्कीमर बसवून लाखोंची लूट करणाऱ्या टोळीचा वसईतील माणिकपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एटीएम कार्डचे क्लोनिंग करुन ही टोळी लाखोंची लूट करत होती. पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. 


सौरभ यादव, धनराज पासवान, पवनकुमार पासवान आणि राकेश चौधरी अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून तीन लॅपटॉप, चार एटीएम कार्ड, काही रोख रक्कम आणि एक मोटारसायकल असा चार लाख 14 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेले चारही आरोपी बिहार मधील असून त्यांचं  शिक्षण दहावी ते बारावीपर्यंत झालं आहे.    


वसईच्या माणिकपूर पोलिसांनी अटक केलेले चारही आरोपी एखाद्या आयटीच्या विद्यार्थ्यांना लाजवतील अशी भन्नाट शक्कल लढवून लाखोंची लूट करत होते. ही टोळी विविध बँकेच्या एटीएम मशीनमध्ये स्कीमर बसवून कार्डचं क्लोनिंग करायचे. त्यामुळे त्यांना संबधीत कार्डधारकाच्या बँक खात्याची माहिती मिळत असत. त्यानंतर या माहितीच्या आधारे क्लोनर आणि सॉफ्टवेअरचा वापर करुन बनावट एटीएम कार्ड तयार करत होते. त्यानंतर बनावट कार्डच्या आधारे एटीएम मशीनमधून खातेधारकांचे पैसे काढत असत. 


अटक केलेले हे संशयित आरोपी वेटर आणि पेट्रोल पंपावरील कामगारांना हाताशी धरुन स्कीमर मशीनमध्ये एटीएम कार्ड स्वाईप करून बॅक खात्यांची माहिती गोळा करत असत आणि त्यानंतर त्या बँक खातेधारकाच्या खात्यातून रक्कम काढत असत, अशी माहिती माणिकपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप यांनी दिली.  


दरम्यान, या टोळीने आणखी किती जणांना फसवलं आहे? या टोळीच्या संपर्कात आणखी कोण आहे का? याची पोलीस अधिक चौकशी करत आहेत, अशी माहिती पोलीस उपाययुक्त संजयकुमार पाटील यांनी दिली.   


स्कीमर म्हणजे काय? 
पैसे काढण्यासाठी आपण एटीएम मशीनमध्ये आपले कार्ड घालतो. जेथे आपण हे कार्ड घालतो त्याच चिपच्या ठिकाणी वरील बाजूस एक उपकरण बसवले जाते. या उपकरणाच्या माध्यमातून आपल्या एटीएम कार्डच्या चीपमधील सर्व माहिती एकत्रीत केली जाते. याबरोबरच कार्डचा पीन माहिती करून घेण्यासाठी एटीएमच्या कीबोर्डमध्ये एक बनावट किबोर्ड किंवा छोटेसे छुपे कॅमेरे बसवले जातात.  यातून कार्डची सर्व माहिती आणि पीन नंबर देखील जाणून घेतला जातो. या संपूर्ण प्रकियेला स्कीमर म्हणतात. 


 स्कीमर  बसवलेले केसे ओळखणार? 
एखाद्या एटीम मशीनमध्ये स्कीमर बसवलेले आपल्याला सहज ओळखता येते. आपण पैसे काढण्यासाठी ज्या रिडरमध्ये कार्ड घालतो तो रिडर सामान्य रिडरपेक्षा जास्त मोठा दिसत आहे का हे लक्ष देऊन पाहा. याबरोबरच पीन टाकण्यासाठी किबोर्ड प्रेस केल्यानंतर तो सामान्य किबोर्डपेक्षा थोडा जास्त पसरेल. शिवाय कार्ड रिडर जर थोड्याफार प्रमाणात लूज झाले असेल तर त्यामध्ये कार्ड घालू नका. या सर्व शक्यतांचा संशय येत असेल तर त्या एटीएममध्ये स्कीमर बसवला असण्याची शक्यता आहे.   


महत्वाच्या बातम्या 


चोरट्यांनी चक्क जेसीबीने फोडले एटीएम, सांगली जिल्ह्यातील मिरजमधील घटना