पंढरपूर : चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला वरुथिनी एकादशी म्हणतात. वर म्हणजे प्रदान करणे आणि अथीनि म्हणजे अंतःकरणातील इच्छा मनोकामना होय . जी एकादशी मनातील सर्व मनोकामना प्रदान करते म्हणून हिला वरुथिनी एकादशी म्हणाले आहे . प्रापंचिक अथवा पारमार्थिक इच्छा पूर्ण करण्याचे सामर्थ्य या दिवसात असल्याने या एकादशीचे व्रत हे दहा हजार वर्षे कठोर तपश्चर्या करून किंवा कुरुक्षेत्रात सूर्यग्रहणाच्या वेळी आठ हजार तोळे सुवर्ण दान करून जे पुण्य मिळते, तेवढेच पुण्य वरुथिनी एकादशी व्रत केल्याने मिळते असे महत्व भगवान कृष्णांनी धर्मराजाला सांगितल्याची मान्यता आहे. या एकादशीच्या व्रतानेच मांधाता, धुंधुमारादी राजर्षी स्वर्गलोकी गेले आणि याच उपासनेच्या कृपेने भगवान शंकर ब्रह्मकपाला पासून मुक्त झाल्याची मान्यता धर्मशास्त्रात सांगितली आहे.
सकळ दानामाझी जाण!
अतिश्रेष्ठ अन्नदान!!
संत एकनाथांनी अन्नदानाचे महत्व सांगताना अन्नदान हे सुवर्णदानपेक्षा सर्वश्रेष्ठ दान असल्याचे सांगितले आहे. अन्नदानाने देव , पीतर आणि मनुष्य याची तृप्ती होते, प्राणांचे रक्षण होते म्हणून अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले गेले आहे. तर कन्यादानाचे महत्वही श्रेष्ठ असल्याचे दाखले येतात. भगवान विष्णूनी गोदान हे कन्यादानासम असल्याचे सांगितले आहे. ज्याच्याकडे अन्नदान करण्याचे सामर्थ्य नाही अथवा कन्यादानाचे पुण्य मिळू शकत नाही त्याने ही वरुथिनी एकादशीचे व्रत केल्यास या दानाचे पुण्य मिळू शकत असल्याचे महत्व सांगण्यात आले आहे.
खरेतर तत्वज्ञानात मानव शब्दाची फोड करताना मा म्हणजे अज्ञान, न म्हणजे निवृत्त आणि व म्हणजे वर्तन करणारा असा केला जातो. अज्ञात निवृत्ती करीता ज्ञानाची गरज असते ते ज्ञान प्राप्त करून देणारी उपासना म्हणजे एकादशीचे व्रत होय. विठुरायाला प्रिय असणाऱ्या या सध्या सरळ व्रताने विठुराया आपल्या वारकरी भक्तांचे सर्व संकटापासून रक्षण करीत असतो. हाताची पवित्रता दानात, पायाची पवित्रता तीर्थाटनात, कंठाची पवित्रता नामस्मरणात हृदयाची पवित्रता परमात्म्यावर निष्ठा ठेवण्यात मनाली जाते. लौकिक आणि अलौकिक फल प्राप्तीसाठी या वरुथिनी एकादशी चे व्रत महत्वाचे मानले गेले आहे.
वरुथिनी एकादशी हि उन्हाळ्यात येते . या काळात भक्त आदिभौतिक,आदिदैविक आणि अध्यात्मिक या तीन प्रकारच्या तापाने तप्त झालेला असतो. आदिभौतिक म्हणजे लौकिक दृष्टीने होणारी तप्तता, आदिदैविक म्हणजे सध्या सुरु असलेला कोरोना आणि इतर नैसर्गिक आपत्ती मुळे येणारी तप्तता आणि अध्यात्मिक म्हणजे मूढता , अज्ञान यामुळे येणारी तप्तता होय. या तीनही तापातून निर्माण झालेली तप्तता घालवणारी उपासना म्हणजे वरुथिनी एकादशीचे व्रत होय.
झाली पापा ताटातुटी !
दैन्य गेले उठाउठी !!
संत तुकाराम महाराजांच्या या दाखल्याप्रमाणे एकादशीच्या व्रताने पाप आणि ताप निघून गेले यामुळे निर्माण झालेले दैन्यंही निघून गेले. म्हणजेच एकादशीच्या व्रताने सर्व प्रकारच्या पाप, ताप आणि दैन्य यापासून सुटका होते म्हणून भागवत संप्रदायात एकादशीचे व्रत हे सर्वश्रेष्ठ मानले जाते.