चंद्रपूर : लग्नपत्रिकेच्या निमंत्रणातच दारूची बाटली आणि चखणा दिल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. धक्कादायक म्हणजे हा व्हिडिओ दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील असून 15 डिसेंबरला चंद्रपूर शहरातल्या एन.डी. हॉटेलमध्ये झालेल्या एका लग्नाची ही निमंत्रणपत्रिका आहे. जिल्ह्यातील दारुबंदीला थेट आव्हान असल्याचा हा प्रकार असल्यामुळे दारूबंदी कार्यकर्त्यांनी या प्रकरणात कारवाईची मागणी केली आहे.


कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून अनेकांना आपल्याकडे लग्नाची पत्रिका यावी आणि आपण यथेच्छ मेजवानी झोडावी असं अनेकदा वाटलं असेल. त्यात जर लग्नाची पत्रिका अशी असेल तर मग विचारायलाच नको. पण मंडळी जरा थांबा कारण ही पत्रिका जर तुमच्याकडे आली असेल तर तुम्ही देखील कायद्याच्या कचाट्यात अडकू शकता. कारण ही पत्रिका आहे दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील. जिल्ह्यात म्हणायला दारूबंदी कागदावरच आहे पण या पठ्ठ्याने तर थेट लग्नपत्रिकेच्या निमंत्रणातच दारूची बाटली आणि चखणा देऊन दारूबंदीची लख्तरं वेशीवर टांगली आहे. पण ज्या अगदी जवळच्या नातेवाईकांना आणि मित्रांना ही खास पत्रिका देण्यात आली त्या पैकी कोणाला तरी याचा व्हिडीओ बनवायचा मोह आवरला नाही. ही पत्रिका सोशल मीडियावर आली काय आणि लगोलग व्हायरल झालं. पत्रिका व्हायरल होताच पत्रिका छापणाऱ्या पुनमचंद भाऊंनी कुठल्यातरी निष्णात वकिलाचा सल्ला घेतला आणि आपला मस्त डिफेन्स तयार केला.


पुनमचंद मंघानी हे बल्लारपूर शहरातील मोठे किराणा व्यापारी आहेत. साहजिकच लग्न देखील दिमाखातच होणार आहे. मात्र त्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातल्या दारूबंदीला आव्हान देण्याची काही गरज नव्हती. मात्र या व्हिडिओमुळे लग्नापेक्षा आता त्यांनी वाटलेल्या पत्रिकेचीच जास्त चर्चा होतेय. चंद्रपुरातील फसलेल्या दारूबंदीची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहे. त्यामुळेच या फसलेल्या किंवा फसवलेल्या दारूबंदीची चौकशी व्हावी अशी मागणी दारूबंदी समर्थक कार्यकर्त्यांनी केली आहे.


या अनोख्या निमंत्रण पत्रिकेचा व्हिडिओ गंमत सध्या व्हायरल होत असला तरी दारूबंदीची वास्तविकता यामुळे दिसून आली आहे. चंद्रपूर पोलिसांसमोर आता यातील सत्यता पडताळून पाहत कारवाई करण्याचे मोठे आवाहान आहे.