मुंबई : नागरिकत्व सुधारित कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) विरोधात वंचित बहुजन आघाडीने पुकारलेला बंद दुपारी मागे घेण्यात आला. वंचित बहुजन आघाडीचे नेते नेते प्रकाश आंबेडकर यांनी तशी घोषणा केली. महाराष्ट्र बंद पूर्णपणे यशस्वी झाल्याचा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला. तसेच ज्या ठिकाणी हिंसाचार झाला त्यामागे वंचितच्या कार्यकर्त्याचा हात नसल्याचंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे. दगडफेक करणारे तोंड बांधून आले होते. त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. आता त्याचा तपास पोलिसांनी करावा, अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली. बंदमध्ये सहभागी झालेल्या जनतेचे आभारही आंबेडकरांनी मानले.
राज्यात ठिकठिकाणी बंदला संमिश्र प्रतिसाद
मनमाड
वंचितच्या महाराष्ट्र बंदला आज मनमाडमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सकाळपासून शहरात सर्व दुकाने, छोटी हॉटेल्स बंद ठेवण्यात आली आहेत. काल संध्याकाळी वंचितच्या कार्यकर्त्यांनी शहरात फेरी काढत बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. त्यामुळे आज अत्यावश्यक सेवा वगळता शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.
मुंबई
वंचितच्या बंदला मुंबईत संमिश्र प्रतिसाद मिळला. काही ठिकाणी या बंदला हिंसक वळण लागलं. कुर्ला रेल्वे स्थानकावरुन चेंबूरकडे जाणाऱ्या 362 क्रमांकाच्या बसवर आंदोलकांनी दगडफेक केली. आंबेडकर गार्डन चेंबूरकडे जात असताना उमर्शिबाप्पा चौक येथे काही आंदोलकांनी ही बस थांबवली आणि तिच्यावर दगडफेक केली. दगडफेकीत चालक किरकोळ जखमी झाला. घाटकोपर-अंधेरी लिंक रोडवर आंदोलकांनी मोर्चा काढत रास्तारोको करण्याचा प्रयत्न केला. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर पूर्व द्रुतगती मार्गावर घाटकोपर रमाबाई आंबेडकरनगर आणि सायन येथे रास्तारोको करण्यात आला. पवईमध्ये देखील जोगेश्वरी-अंधेरी लिंक रोडवर आंदोलकांनी रस्त्यावर उतरुन निदर्शने केली. मुलुंड, विक्रोळी, सायन आणि घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकरनगर मध्ये दुकाने बंद करण्यात आली आहेत.
उल्हासनगर
उल्हासनगर शहरात वंचित बहुजन आघाडीनं पुकारलेल्या भारत बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. शहराच्या अनेक भागात व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवली होती. उल्हासनगरच्या सुभाष टेकडी, व्हीनस चौक, बाजारपेठ या भागात बंदचा मोठा प्रभाव दिसून आला. बंदचं आवाहन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शहरात रॅली काढली होती. या रॅलीत सीएए आणि एनआरसी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवली होती. तर पोलिसांनीही शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. तर नागरिकांनीही घराबाहेर न पडणं पसंत केल्यानं रस्त्यांवरही शुकशुकाट पाहायला मिळाला.
भिवंडी
भिवंडीत बंदला थंड प्रतिसाद मिळाला. मोजके पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी धामणकर नाका याठिकाणी निदर्शने करुन दुकाने बंद केली आणि रस्त्यावर उतरत जोरदार घोषणाबाजी करण्यात केली. पोलिसांनी 50 ते 60 कार्यकर्त्यांची धरपकड करुन ताब्यात घेतलं. बंदच्या पार्श्वभूमीवर भिवंडी पोलिसांनी ठिकठिकाणी चोख असा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
अंबरनाथ
वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या बंदला अंबरनाथमध्ये रिक्षाचालकांनी पाठींबा जाहीर केला आहे. त्यामुळे सकाळी 6 वाजेपासून शहरात रिक्षासेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. सीएए आणि एनआरसी विरोधात पुकारलेल्या या बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन वंचित बहुजन आघाडीनं केलं होतं. त्याला व्यापारी आणि रिक्षाचालकांनी पाठींबा दिला आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी शहरातल्या सर्व रिक्षा बंद ठेवण्यात आल्या असून वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते शहरात फिरून बंद पाळण्याचं आवाहन करत होते.
अकोला
अकोल्यात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. बंदच्या पार्श्वभूमीवर अकोला शहरातील शाळा, महाविद्याल पूर्णपणे बंद आहेत. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधीमार्ग आणि टिळक मार्गावरील दुकानं बंद होती. वंचितचे कार्यकर्ते शहरात फिरुन बंदला प्रतिसाद देण्याचं आवाहन करत होते.
जळगाव
बुलडाणा जिल्ह्यात काही ठिकाणी संमिश्र तर काही ठिकाणी अत्यल्प प्रतिसाद मिळाला. बुलडाणा शहरात सकाळपासून व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवत या बंदला संमिश्र प्रतिसाद दिला. जिल्ह्यात जळगाव जामोद, नांदुरा शहरात चांगला प्रतिसाद पाहायला मिळला.
बारामती
वंचितच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला इंदापूर व बारामतीत चांगला प्रतिसाद मिळाला. आज सकाळी बारामती व इंदापूरच्या बाजारपेठा बंद होत्या. नागरिकत्व सुधारणा कायदा व एनआरसी व खासगीकरणाला विरोध म्हणून प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली. आज इंदापूर आणि बारामतीत बाजारपेठ सकाळी बंद होती. बंद शांततेत पार पडला. पोलिसांनी ठिकठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. अत्यावश्यक सेवा वगळता बंदला चांगला प्रतिसाद मिळाला.
जालना
जालना बहुजन वंचितने पुकारलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. वंचितच्या कार्यकर्त्यांनी बंददरम्यान व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन करत असताना पोलीस आणि कार्यकर्त्यामध्ये बाचाबाची झाली. शहरातील मामा चौकात वंचितच्या कार्यकर्त्यांनी काही व्यापाऱ्याना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. दरम्यान यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यामध्ये शाब्दिक संघर्ष देखील पाहायला मिळाला.
नंदुरबार
नंदुरबारमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहादा शहरात कडकडीत बंद ठेवण्यात आला, तर नंदुरबारमध्ये अनेक ठिकाणी व्यवहार सुरळीत होते. मुस्लीम बहुल भागांमध्ये मात्र या बंदचा सर्वाधिक परिणाम दिसून आला. या भागातील सर्व दुकाने बंद होती. जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे बंदचा चांगला परिणाम दिसून आला. बंद शांततेत पार पडावा यासाठी जिल्ह्यात चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.