मुंबई : भाजप सरकारच्या काळात काही नेत्यांचे फोन टॅप झाल्याचा आणि काही नेत्यांवर पाळत ठेवण्यात आल्याचा आरोप आताच्या सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश गृह विभागाने दिले आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे,संजय राऊत यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले असे आरोप करण्यात आले होते. काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी फोन टॅपिंगचा आरोप केला होता. फोन टॅपिंग ही विकृती आहे, असा घणाघात गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर केला आहे. तर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून या आरोपाच खंडण करण्यात आले.

Jitendra Awhad | फोन टॅपिंग ही विकृती : जितेंद्र आव्हाड | ABP Majha



जितेंद्र आव्हाड म्हणाले, पेगासेस आणि फोन टॅपिंग बद्दल भाजप प्रचंड अस्वस्थ आहे. फोन टॅपिंग ही विकृती आहे. ही विकृती का केली याची चौकशी पाहिजे. भीमा कोरेगाव हे षडयंत्र आहे. महाराष्ट्रातील बहुजनांमध्ये भांडण लावण्याचा भाजपचा हा कट आहे. दलित समर्थाकांना बदनाम करायचं आणि आंबेडकरी चळवळ संपवायची हा भाजपचा अजेंडा आहे. त्यामुळे या प्रकरणांची चौकशी सुरू होत आहे म्हणून मी आनंदी आहे. लोकांच्या खासगी आयुष्यात डोकवण्याची गरज काय आहे. तुमचे आणि माझे राजकीय मतभेद आहे. ही विकृती असून याची चौकशी होत आहे. ही विकृती कोणी केली हे संपूर्ण देशाला आणि जगाला कळाले पाहिजे. पेगासेस विकत घेण्याचा अधिकार महाराष्ट्र सरकारला होता का? हा प्रश्न देखील जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, टॅपिंगचा आरोप ज्या काळात होतोय त्या काळात गृहराज्यमंत्री शिवसेनेकडेही होतं, असं म्हणत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सेनेकडे बोट दाखवलं आहे. केवळ आरोप करण्यात अर्थ नाही,असं कोणतंही टॅपिंग झालं नाही असं मुनगंटीवार म्हटले आहेत.


संजय राऊत यांनी देखील या संदर्भात एक ट्वीट केले होते. संजय राऊत आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, 'माझा फोन टॅप होत आहे, ही माहिती मला भाजपच्या एका वरिष्ठ मंत्र्याने दिली होती. मी म्हणालो होतो, भाईसाहेब, माझं बोलणं कोणाला ऐकायचं असेल, तर स्वागतच आहे. मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिष्य आहे. कोणतीही गोष्ट लपून छपून करत नाही. ऐका माझं संभाषण'.