सोलापूर : लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने सर्व 48 जागांवर आपले उमेदवार उतरवले होते. आता विधानसभा निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे लढणार आहे, असं प्रकाश आबंडेकर यांनी स्पष्ट केलं आहे.
विधानसभा निवडणुकीत कुणासोबतही जाणार नाही. विधानसभेत सर्व जागांवर वंचित बहुजन आघाडी लढणार असल्याची भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केली. लोकसभा निवडणुकीतही प्रकाश आंबेडकरांनी स्वतंत्र निवडणूक लढवली होती. काँग्रेस-राष्ट्रवादीने वंचित बहुजन आघाडीला महाआघाडीत घेण्यासाठी प्रयत्न केले होते, मात्र ते सर्व अपयशी ठरले.
प्रकाश आंबेडकरांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली. नरेंद्र मोदींचा तोल सुटला असावा त्यामुळेच त्यांनी राजीव गांधींवर टीका केली. वैयक्तिक टीका करणे म्हणजे निवडणूक नरेंद्र मोदींच्या हातातून निसटत चालल्याचे निदर्शक आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
पंतप्रधान म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठिंबा देणार नसल्याची भूमिकाही प्रकाश आबंडेकर यांनी स्पष्ट केली. तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींपेक्षा बसपा प्रमुख मायावतींना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देऊ, असंही प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.