Election 2024 Hingoli:आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला असताना एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. एकीकडे राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री पदावरुन दावे-प्रतिदावे आणि पक्षांतर्गत वाद रंगत असताना तिसऱ्या आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर (Rajratna Ambedkar) यांनी केली आहे. राजरत्न आंबेडकर यांनी तिसऱ्या आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यात तिसऱ्या आघाडीला कितपत यश मिळतं आणि हा प्रस्ताव मनोज जरांगे पाटील स्वीकारतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
तिसऱ्या आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरला!
महाविकास आघाडी आणि महायुतीनंतर राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तिसरी आघाडी होऊ पाहत आहे. या आघाडी बाबत बोलताना राजरत्न आंबेडकर यांनी आमच्या आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा मनोज जरांगे असतील अशी माहिती दिली आहे. ते आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावर होते. तेव्हा माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.
तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे (VBA) प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनीही आज मोठे वक्तव्य करत मोठा खळबळजनक दावा केला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर एकमेकांचे कट्टर वैरी झालेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात पडद्यामागे चर्चा सुरु असून या दोघांची एक गुप्त भेट झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. सिद्धार्थ मोकळे यांच्या या दाव्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार का, अशा चर्चांना आता उधाण आले आहे.
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यावर काय म्हणाले आंबेडकर?
दरम्यान, सिद्धार्थ मोकळे यांच्या या दाव्यायानंतर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात पडद्यामागे चर्चा सुरु असून या दोघांची एक गुप्त भेट झाल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे (VBA) प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी केला. याबाबत विचारले असता प्रकाश आंबेडकर म्हणाले की, त्यांच्या कडची माहिती त्यांनी पब्लिक केली. मागच्या निवडणुकीत संविधान आणि आरक्षणवाद्यांना फसविण्यात आले आहे. पुन्हा फसविण्यात येऊ नये, असे त्यांनी म्हटले असल्याचे ते म्हणाले.
हे ही वाचा