Jalgaon News Update : गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या कारवाई विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्यात आला. न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाच्या वतीने जळगाव जिल्ह्यात गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवले जात आहे. या कारवाईत जळगाव तालुक्यातील काही घरांचे अतिक्रमण हटविण्याचे काम सुरू आहे. या कारवाईच्या विरोधात आंदोलक आक्रमक झाले आहेत. हा मोर्चा गुलाबराव पाटील यांच्या निवस्थानी जात असताना जळगावातच मुंबई नागपूर हायवे उड्डाणपूलावर पोलिसांनी अडवला.
पोलिस आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत आंदोलनकर्त्यांची काही वेळ खडाजंगी झाली. आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचं लक्षात आल्यानंतर मंत्री गुलाब पाटील यांनी महामार्गावरच बसून आंदोलकांच्या मागण्या समजून घेतल्या. न्यायालयाचे आदेश असल्याने यात आपल्याला काही करता येणे शक्य नाही. मात्र हा विषय आपण सरकार दरबारी मांडून त्यात काही करता येण्यासारखे असेल तर ते करण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी तात्पुरती दोन दिवसांसाठी कारवाई स्थगित करीत असल्याचं आश्वासन आंदोलकांना पाटील यांनी दिले. त्यांतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र, यावेळी पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.
पोलिसांनी मोर्चा अडवल्यानंतर आंदोलकांनी महामार्गावरच ठिय्या दिला. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. आंदोलनामुळे वाहतुकीचा खोळंबा होवू नये म्हणून दुसऱ्या बाजूने वाहने वळविण्यात आली होती. यावेळी पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोठ्या संख्येने यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसह महिला तसेच नागरिकांची आंदोलनात उपस्थिती होती.
गायरान जमिनीवर अनेक वर्षांपासून नागरिक वास्तव्य करीत आहेत. मात्र, आता शासनाने या गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिल्याने या जमिनीवर वास्तव्य करत असलेले हजारो नागरिक बेघर होणार आहेत. त्यामुळे ही कारवाई थांबविण्यात यावी आणि संबंधित नागरिकांसाठी पर्यायी उपाययोजना करण्यात यावी, या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.
...तर पुन्हा मोर्चा काढणार
मंत्री गुलाबराव पाटील यांनी तात्पुरती कारवाई थांबवण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, त्यानंतरही पुन्हा कारवाई झाल्यास हिवाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारण्यात येईल. तसेच हा मोर्चा मुंबईत काढण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी शमीभा पाटील यांनी यावेळी दिला.
शासकीय दौऱ्यात या मागण्यांबाबत आंदोलकांसोबत चर्चा करण्याबाबत नमूद होते. मात्र त्यानुसार आंदोलकांची भेट झाली नाही आणि आंदोलकांनी थेट मोर्चा काढला. आंदोलकांसोबत चर्चा केली असून या कारवाईला तूर्तास स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी बोलताना दिली.
महत्वाच्या बातम्या