अकोला : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रकाश आंबेडकरांशी आघाडीसाठी चर्चा करणार असल्याचं वक्तव्य अकोल्यात केलं होतं. आज पटोलेंच्या प्रस्तावावर वंचित बहुजन आघाडीने आपली भूमिका जाहीर केली आहे. पटोले यांनी चर्चेच्या बाता करण्याआधी दिल्लीच्या हायकमांडची परवानगी घ्यावी, असं वंचित बहुजन आघाडीनं म्हटलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी आज अकोल्यात पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका जाहीर केली आहे. याआधीही राज्यातील काँग्रेस नेत्यांनी आघाडी साठी केलेले प्रयत्न दिल्लीतील हायकमांडनी हाणून पाडल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. आता नाना पटोलेंनी अशीच चर्चा करून तोंडघशी पडू नये असा टोला वंचित बहुजन आघाडीने आज पटोलेंना लगावला आहे. 


काय मांडली वंचितनं भूमिका : 
आज पटोले यांनी संभाव्य आघाडीसंदर्भात चर्चेच्या संकेतांवरून आज वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसच्या दिल्लीतील नेतृत्वावर जोरदार टीका केली आहे. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी अनेक गंभीर आरोप काँग्रेस पक्षश्रेष्ठींवर केले आहेत. नाना पटोले यांनी आंबेडकरांशी आघाडीची चर्चा सुरू करणार असल्याचं म्हटल्यानं राज्यात मुदतपूर्व निवडणुक होण्याची शक्यता वंचितनं व्यक्त केली आहे. त्यामुळेच पटोलेंचा दौरा आणि त्या अनुषंगाने होत असलेल्या चर्चा जोरात असल्याचं वंचितनं म्हटलं आहे. काँग्रेस आंबेडकरांशी आघाडी करण्यास कायम अनुत्सुक असल्याचं वंचितनं म्हटलं आहे. यासाठी त्यांनी भूतकाळातील काही राजकीय घडामोडींचे दाखले दिले आहेत. यासाठी अशा आघाडीसाठी राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी मोठे प्रयत्न केलेत. मात्र, दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी या प्रयत्नांना प्रतिसाद न दिल्याने यातून काहीच निष्पन्न झालं नाही. यासाठी अशोक चव्हाण मुख्यमंत्री असतांना त्यांनी आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे मोठे प्रयत्न केले होते. परंतु, तो प्रयत्न हाणून पाडला गेला होता. 


काँग्रेसचा निवडणुकांमध्ये स्वबळाचा नारा! नाना पटोलेंचं वक्तव्य आणि राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण


काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी फेटाळला होता आंबेडकरांना केंद्रीय मंत्रीपद देण्याचा प्रस्ताव : 
या पत्रकार परिषदेत आज वंचित बहुजन आघाडीने एक मोठा राजकीय गौप्यस्फोट केला. 2012 मध्ये तत्कालीन केंद्रीयमंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनामुळे त्यांचं पद रिक्त झालं होतं. यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी या रिक्त मंत्रीपदावर आंबेडकरांना घेण्याचा प्रस्ताव काँग्रेस पक्षश्रेष्ठींसमोर ठेवला होता. मात्र, काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी आंबेडकरांविषयी असलेल्या असुयेतून हा प्रस्ताव फेटाळल्याचा आरोप वंचितनं केला आहे. 


"आम्हाला सोबत राहून पाठीत सुरा खुपसायची सवय नाही, काँग्रेस निवडणुका स्वबळावर लढणार" : नाना पटोले


काय म्हणाले होते नाना पटोले आघाडीसंदर्भात : 
निवडणूक आली की, काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांच्या राजकीय आघाडीची मोठी चर्चा सुरू होते. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चर्चेनंतरही ही आघाडी होऊ शकली नाही. प्रकाश आंबेडकरांनी लोकसभेत 42 लाख आणि विधानसभेत 27 लाखांवर मतं घेत काँग्रेस आघाडीचे मोठं नुकसान केलं होतं. या सर्व पार्श्वभूमीवर 11 जूनला अकोल्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी आंबेडकरांशी भविष्यात जुळवून घेण्याची संकेत दिले होते. प्रकाश आंबेडकरांशी आघाडीच्या दृष्टीने चर्चा करणार असल्याचं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलं होतं. नाना पटोले काँग्रेसच्या संघटनात्मक कामांचा आढावा घेण्यासाठी विदर्भाच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकरांशी भविष्यातील आघाडीच्या मुद्द्यावर संकेत दिलेत. धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन टाळण्यासाठी आंबेडकरांशी चर्चा करणार असल्याचं पटोले म्हणालेत. काही छोट्या पक्षांशीही आघाडीसंदर्भात चर्चा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, सध्या आंबेडकरांशी कोणतीही चर्चा सुरू नसल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं होतं. 


Nana Patole : भविष्यात आघाडीसंदर्भात प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करू : नाना पटोले


स्वबळाची भाषा करणारे पटोले आघाडीची चर्चा का करतात?, वंचितचा पटोलेंना सवाल : 
अकोला जिल्हा दौऱ्यावर असताना नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा देण्यासोबतच समविचारी पक्षांना सोबत घेण्यासाठी चर्चा सुरू असल्याचे स्पष्ट केले होते. ही चर्चा केवळ वृत्तपत्रातूनच आहे का? की चर्चा करण्याचा अधिकार तुम्हाला दिल्लीतून मिळाला आहे?,अशी विचारणा करीत वंचितनं पटोलेंना केली आहे. एकीकडे स्वबळाची चर्चा करतांना आघाडीची चर्चा करण्यामागे पटोलेंचा काय हेतू आहे?, असा सवालही वंचितनं त्यांना केला आहे. 


शिवसेना-राष्ट्रवादीची जवळीक काँग्रेसला सलतेय? महाविकासआघाडीतून काँग्रेस बाहेर पडणार?


पटोले 'बहुजन' असल्यानं त्यांची काळजी :


वंचित बहुजन आघाडीने पटोले यांना आपण कधी कुणाला फसवत नाही. त्याबरोबरच काँग्रेस नेतृत्वावर अविश्वास दाखवत नसल्याचं स्पष्ट केलं. आघाडीसाठी चर्चेचा प्रस्ताव ठेवणाऱ्या पटोलेंचा हेतू स्वच्छ असेल. मात्र, यासाठी त्यांनी आधी दिल्लीश्वरांना तयार करावे असं पुंडकर म्हणालेत. पटोले बहुजन समाजातील नेतृत्व असल्याने त्यांची काळजी वाटत असल्याचे डॉ. धैर्यवर्धन पुंडकर म्हणालेत. वंचितच्या आजच्या भूमिकेनंतर आता परत काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.