माझ्या वैधव्याला व्यवस्था जबाबदार : वैशाली येडे यांची टीका
एबीपी माझा वेब टीम | 11 Jan 2019 08:25 PM (IST)
अडचणीच्यावेळी दिल्लीतच तर गल्लीतही बाईच कामी येते हे पुन्हा पुन्हा सिद्ध झाले आहे. आज दिल्लीची नाही तर गल्लीची बाई कामात आली आहे. आम्ही विधवा नाही एक महिला आहोत. नवरा कमकुवत होता तो गेला मी लढणार आहे. सध्या शेतकरी आणि लेखकाला भाव नाही, असेही उद्घाटक वैशाली येडे म्हणाल्या.
यवतमाळ : सध्या शेतकरी आणि लेखकाला भाव नाही. माझ्या वैधव्याला व्यवस्था जबाबदार आहे, अशा शब्दात सरकारवर घणाघात करत साहित्य संमेलनाच्या उद्घाटक वैशाली येडे यांनी 92 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले. अडचणीच्यावेळी दिल्लीतच तर गल्लीतही बाईच कामी येते हे पुन्हा पुन्हा सिद्ध झाले आहे. आज दिल्लीची नाही तर गल्लीची बाई कामात आली आहे. आम्ही विधवा नाही एक महिला आहोत. नवरा कमकुवत होता तो गेला मी लढणार आहे. सध्या शेतकरी आणि लेखकाला भाव नाही, असेही उद्घाटक वैशाली येडे म्हणाल्या. साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात रिमोटद्वारे बटण दाबून दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. लेखिका नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून बोलवण्यात आले होते. मात्र त्यांना दिलेले निमंत्रण मागे घेतल्यानंतर शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवेच्या हस्ते या साहित्यसंमेलनाचे उद्घाटन करण्याचा निर्णय झाला होता. नयनतारा सहगल यांच आमंत्रण रद्द केल्यानंतर उद्घाटक म्हणून काही नावं सुचवण्यात आली होती. मात्र त्यापूर्वीच साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. संमेलनाचं उद्घाटन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते करण्यात यावा, अशी मागणी आयोजकांकडून करण्यात आली होती. ही मागणी मान्य करत महामंडळाने यवतमाळमधील कळंब तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची पत्नी वैशाली सुधाकर येडे यांना साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून मान दिला होता.