औरंगाबाद : औरंगाबादेत दोन गावांची इंटरनेट सुविधा आठवडाभर काही कालावधीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे. गंगापूर आणि वैजापूर तालुक्यांत चोरांच्या अफवांचं पेव फेटल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता.

गंगापूर आणि वैजापूर तालुक्यातील गावांची इंटरनेट सुविधा 15 जूनपासून पुढील गुरुवार (21 जून) रोजी संध्याकाळी सात वाजल्यापासून पहाटे दोन वाजेपर्यंत बंद राहणार होती.

चोरांच्या अफवांचं पेव फुटल्यामुळे शांतता अबाधित राहावी म्हणून वैजापूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. चोरांच्या अफवेमुळे राज्यात इंटरनेट बंद करण्याची ही पहिलीच वेळ ठरली असती.

कोणत्या घटना

चोरीच्या अफवेमुळे आज पाडेगावमध्ये दोन संशयितांना शेकडो नागरिकांकडून बेदम मारहाण झाली. मारहाणीत दोघं जण गंभीर जखमी झाले. छावणी पोलिस वेळीच पोहचल्यामुळे गावकऱ्यांच्या तावडीतून दोघांची सुटका करण्यात आली.

गेल्या आठवड्यात चोर असल्याच्या संशयातून आठ जणांना मारहाण करण्यात आली होती, त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला होता. पाच-सहा जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं, तर 400 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला होता.