मुंबई : मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेल्या अभिनेता आमीर खानला थेट कोल्हापूरवरुन निमंत्रण आलं आहे. कोल्हापूरच्या तालमीतील पैलवानांनी आमीरला आखाड्यात येण्याचं निमंत्रण दिलं आहे.
महत्त्वाचं म्हणजे मोतीबाग तालमीचे वस्ताद आणि 'रुस्तुम-ए-हिंद' दादू चौगुले यांचं निमंत्रण आमीरने स्वीकारलं आहे. आमीर खान येत्या 19 डिसेंबरला कोल्हापूरला जाणार आहे.
आमीर खानचा दंगल हा सिनेमा प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आहे. सिनेमाचा ट्रेलर आणि गाण्यांमुळे सिनेमाबाबतची उत्कंठा शिगेला पोहचली आहे.
आमीरच्या कामाने दादू चौगुले खूपच प्रभावीत झाले आहेत. त्यामुळेच दादू चौगुले यांनी कोल्हापूरच्या प्रसिद्ध मोतीबाग तालमीत येण्याची विनंती आमीरला केली.
मोतीबाग तालमीत केवळ राज्यातूनच नव्हे तर देशभरातील मल्ल कुस्तीच्या प्रशिक्षणासाठी येतात. मोतीबाग तालीम देशभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे आमीर खाननेही या आखाड्याला भेट देण्याची विनंती दादू चौगुले यांनी केली. आमीर खानने पारंपारिक कुस्ती पाहावी, अशी त्यांची इच्छा आहे.
कोल्हापुरात अजूनही मातीतील कुस्ती खेळली जाते. मातीत दूध, तूप, हळद मिसळून ही माती रोगप्रतिकारक बनवली जाते. या मातीत कुस्ती होते, हे आमीर पाहणार आहे.