Chitra wagh vs Urfi Javed : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रामध्ये नंगानाच चालू देणार नाही, असा इशारा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद हिला दिला आहे. मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत चित्रा वाघ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उर्फीला विरोध नाही, पण तिचा जो नंगानाच सुरु आहे, त्याला विरोध आहे, असे चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले.
एक बाई भरदिवसा रस्त्यावर उघडी फिरते, नगण्य कपडे घालून अंगप्रदर्शन किती योग्य? असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. मुंबईच्या भर रस्त्यात सार्वजनिक ठिकाणी उर्फी नावाची एक महिला नंगा नाच करत आहे. एक महिला मला सतत मेसेज करत होती मला बोलायचे आहे. एक दिवस मला त्या महिलेने एक व्हिडिओ पाठवला. एक मुलगी अंगावर नगण्य कपडे घालून सार्वजनिक ठिकाणी आपल्या शरीराचे प्रदर्शन करताना दिसली. ज्या महिलेने मला व्हिडिओ पाठवला तिच्याशी बोलले तेव्हा त्या म्हणाल्या माझी मुलगी याला बळी पडली आहे. त्याचमुळे मी भूमिका घेतली आहे. शिवाजी महाराज यांच्या राज्यात असा नंगा नाच चालू देणार नाही, असा इशारा यावेळी बोलताना चित्रा वाघ यांनी उर्फीला दिला.
माझा विरोध उर्फीला नाही तिच्या नंगा नाच वृत्तीचा आहे. अरे आधी कपडे तर घाला मग ठरवा कुणी काय घालायचे. ज्या ठिकाणी समाज महत्वाचा असतो त्याठिकाणी राजकारण करू नये. पण दुर्दैवाने आपल्या राज्यात तसे झाले नाही. जो नंगा नाच सुरू आहे ते आपल्या महाराष्ट्र्ला शोभनीय नाही. असला नंगा नाच राज्यात चालू देणार नाही, असे चित्रा वाघ म्हणाल्या. कुणी काय कपडे घालावे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे असे महिला आयोग म्हणतंय. महिला आयोग म्हणत अशासाठी वेळ घालवणार नाही, महिला आयोगाला जाब विचारायचा नाही मग काय करायचे? केसेस सोडवणे तुमचे काम आहे. अशा अश्लील व्हिडिओची दखल घेतली नाही मग आयोगाच्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही, असा सवाल चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना विचाराला.
एकाच विषयात दुटप्पी भूमिका घेणारा आयोग आहे. वेब सिरीजच्या पोस्टर्सवर अंग प्रदर्शन करतात म्हणून नोटीस काढली. एका ट्वीटरवर आलेल्या बातमीची दखल घेत वेब सिरीजला नोटीस पाठवली, दिग्दर्शक व अभिनेत्रीस नोटीस पाठवण्यात आली. पोस्टरमुळे अंग प्रदर्शन व धुम्रपान संदर्भात उमटत असलेल्या प्रतिक्रियांमुळे नोटीस ट्विटरची दखल घेणारे असा नंगानाच कसा सहन करते? व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली हा नंगानाच सहन करणार नाही, असा इशारा चित्रा वाघ यांनी दिलाय.
महिला आयोगाने तेजस्विनी पंडितला नोटीस पाठवली. अनुराधा वेबसिरीजसाठी पोस्टर लावले म्हणून तिला नोटीस पाठवली. पण उर्फीला गोंजारायचे काम सुरू आहे. उत्तर नको कृती हवी. महिला आयोगाने उडी मारून तरंगू नये प्रकरण काठाला लागतं का बघा. या राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार आहे त्यामुळे तुमच्यावर अवलंबून नाही. सावित्रीबाई यांच्या जयंती साजरी करून आपण सावित्री होत नाही, असा टोलाही यावेळी चित्रा वाघ यांनी लगावला.