नागपूर : देशाची सुरक्षा भेदण्याच्या तयारीत असलेल्या एकाला अटक केली आहे. उत्तर प्रदेश एटीएस आणि लष्कराने ही कारवाई केली असून निशांत अग्रवाल असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. निशांत ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या प्रोजेक्टमध्ये इंजिनीअर आहे. सुरक्षे संदर्भातील गोपनीय माहिती पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयला दिल्याचा निशांतवर आरोप आहे.


निशांत भारताच्या सुरक्षेची ताकद असलेल्या ब्राम्होस मिसाईलशी संबधित माहिती पाकिस्तान आणि अमेरिकेला देत असल्याची माहिती समोर येत आहे. निशांत डीआरडीओच्या ब्राम्होस युनिटमध्ये कार्यरत असल्याने रिसर्च विंगची बरीच गुप्त माहिती त्याच्याकडे होती.


निशांत उत्तराखंडचा रहिवाशी आहे आणि गेल्या चार वर्षांपासून तो नागपूरच्या युनिटमध्ये कार्यरत आहे.


कोण आहे निशांत अग्रवाल?


- निशांत अग्रवाल हा मूळचा उत्तराखंडच्या रुरकीचा आहे
- निशांत मॅकेनिकल इंजिनीअर असून डीआरडीओच्या क्षेपणास्त्र युनिटमध्ये शास्त्रज्ञ पदावर कार्यरत आहे
- डोंगरगाव येथील प्लांटमध्ये तो कार्यरत आहे
- नागपुरच्या उज्ज्वल नगर परिसरातील मनोहर काळे यांच्या घरात निशांत गेल्या चार वर्षांपासून राहत आहे
- यावर्षी मार्च महिन्यात निशांतचा विवाह झाला आहे.


ब्राम्होस वैशिष्ट्य


- ब्राह्मोस हे भारत आणि रशियाच्या संयुक्त संशोधनातून तयार झालेले मिसाईल आहे
- कमी अंतरापर्यंत वार करणारं हे मिसाईल, जमीन, विमान, जहाज आणि पाणबुडीत वापरले जाते
- हवेतच मार्ग बदलणे आणि चालत्या लक्ष्यालाही उद्ध्वस्त करण्याची क्षमता ब्राह्मोसमध्ये आहे
- लष्कर, वायूदल आणि नौदल या तिन्ही सुरक्षा यंत्रणांसाठी ब्राह्मोस उपयुक्त आहे
- अवघ्या 10 मिटरच्या उंचीवरुन उडण्याची क्षमता ब्राह्मोसमध्ये आहे
- शिवाय ब्राह्मोस मिसाईल रडारवरही पकडले जाऊ शकत नाही
- ब्राह्मोसला पकडणं किंवा उद्ध्वस्त करणं कठीणच नव्हे अशक्य आहे
- ब्रोह्मोस मिसाईल अमेरिकन टॉमहॉक मिसाईलच्या दुप्पट वेगाने वार करते