नागपूर: सराईत चोरट्याने पापणी लवण्यापूर्वी चोरी केली, पण त्यापेक्षा दोन पावलं पुढे असलेल्या पोलिसांनी, अवघ्या 26 सेकंदात चोर पकडण्याची कमाल केली. अतिशयोक्ती वाटावी अशी घटना नागपुरात घडली.

जर एखादा चोर चोरी केल्यानंतर अवघ्या 26 सेकंदात पकडला जात असेल तर तुम्ही त्याला काय म्हणणार? कदाचित तो तुम्हाला अनुभवहीन चोर वाटेल. मात्र, हा शातीर चोर त्याच्या अनुभवहीनतेमुळे नव्हे तर नागपूर रेल्वे स्टेशनवरील इंटिग्रेटेड सीसीटीव्ही सर्व्हिलन्स सिस्टिममुळे काही सेकंदातच आरपीएफच्या जाळ्यात अडकला आहे.



नागपूर रेल्वे स्थानकावर शनिवारी संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमारास सुनील राय नावाचा शातीर चोर दाखल झाला आणि इकडे तिकडे फिरू लागला. रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या जवानांनी त्याला  इंटिग्रेटेड सीसीटीव्ही सर्व्हिलन्स सिस्टमवर पाहताच त्याच्यावर नजर ठेवणे सुरु केले. थोडावेळ इकडे तिकडे घुटमळल्यानंतर, सुनील राय एका झोपलेल्या प्रवाशाच्या बाजूला जाऊन बसला. त्यानंतर त्याने मोठ्या शिताफीने झोपलेल्या प्रवाशाच्या पॅंटच्या मागच्या खिशातून त्याचं पाकीट काढलं आणि तिथून निघून गेला.

हा सर्व प्रकार आरपीएफचे जवान सीसीटीव्हीत पाहात होते. चोरीनंतर सुनील मोठ्या मुश्किलीने 10 ते 15 पावलं पुढे गेला असेल, तेवढ्यात त्याला रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या जवानाने येऊन पकडले. 5 वाजून 35 मिनिटं आणि 14 सेकंदाला पर्स काढणारा सुनील 5 वाजून 35 मिनिटं आणि 40 व्या सेकंदाला आरपीएफ जवानांच्या तावडीत सापडला.

मी काहीच केले नाही असा आक्रोश चोरट्याने केला. मात्र, जेव्हा आरपीएफने त्याला सीसीटीव्ही दाखवला, तेव्हा सुनीलने मुकाट्याने त्याचे गुन्हे कबुल केले.