नागपूर: मी आणि मुख्यमंत्री घराणेशाहीपासून दूर आहोत, असं केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी म्हणाले. ते नागपुरात बोलत होते. राजकारणात येण्याआधी अनेकजण समाजाच्या विकासाच्या गोष्टी करतात. पण एकदा निवडून आले की बहुतेकजण समाजाला विसरतात. मग घराणेशाही सुरु होते, असं गडकरी म्हणाले.
मात्र या सगळ्या घराणेशाहीपासून मी आणि मुख्यमंत्री दूर आहोत. कारण त्यांची मुलगी लहान आहे आणि माझ्या कुटुंबात कोणीही राजकारणात येण्यास इच्छुक नाही, असं गडकरींनी नमूद केलं. नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या गोर बंजारा मेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून बंजारा बांधव उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांचे वडील राजकारणात होते. मात्र त्यांनी मुलाला राजकारणात आणलं नाही. तर आम्ही त्यांच्या वडिलांना विनंती करुन देवेंद्र यांना राजकारणात आणलं, असंही नितीन गडकरी यांनी सांगितलं.
गडकरी नेमकं काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीसांच्या वडिलांच्या नेतृत्त्वात मी काम केलं. त्यांच्या आई-वडिलांनी मला सांगितलं नव्हतं की माझ्या मुलाला तिकीट द्या. त्यांच्या घरी मी आणि छोटू भय्या नारकर म्हणून आमचे कार्यकर्ते होते, दोघे मिळून गेलो होतो. वडील आजारी होते. मी त्यांना सांगितलं की देवेंद्रला राजकारणात पाठवा. आम्हाला त्यांना महापालिकेचं तिकीट द्यायचं आहे. त्यावर ते म्हणाले मला काही अडचण नाही, पण त्यांच्या आईला आणि स्वत: देवेंद्रला विचारा. त्यांची तयारी असेल तर त्यांनी जावं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे वडील आमदार होते म्हणून तिकीट मिळालं नाही. तर जनता, कार्यकर्ते आणि पक्ष त्यांच्या घरी गेले आणि देवेंद्र फडणवीस यांना राजकारणात आणलं.
अशी परिस्थिती राजकारणात असेल तर चालेल, पण केवळ आई-वडील राजकारणात कोणत्या पदावर आहेत म्हणून मुलाला तिकीट द्यावं हे चालणार नाही. तिकीट हे समाजाने मागावं, जनतेने मागावं, असं गडकरी म्हणाले.
लोक निवडून येईपर्यंत समाजाचं नाव घेतात, निवडून आल्यानंतर माझ्या मुलाला, मुलीला तिकीट द्या म्हणतात. पण मी आणि देवेंद्र सुखी आहे, देवेंद्रची मुलगी लहान आहे आणि माझ्या कुटुंबातील कोणीही तिकीट मागायला येणार नाही. कारण माझा घराणेशाहीला विरोध आहे.
पण याचा अर्थ कोणाचा मुलगा असणं गुन्हा नाही. सुधाकरराव नाईकांना वसंतराव नाईकांमुळे संधी मिळाली, पण सुधाकररावांमध्येही कर्तृत्त्व होतं. त्यानंतर मनोहर नाईकांनाही संधी मिळाली, त्यांचंही कर्तृत्व होतं. त्यानंतर आता नील नाईकांना संधी मिळाली. याचं कारण ते केवळ नाईक घराण्यातील आहेत असं नाही, तर त्यांचं कार्य, कर्तृत्व आणि क्षमता बघून त्यांना संधी मिळाली आहे, असं नितीन गडकरींनी नमूद केलं.