मुंबई: शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडीओ वादात आता उर्फी जावेद हिने उडी घेतली आहे. माझ्या कपड्यांवरुन माझ्या कॅरेक्टरवर बोट दाखवणाऱ्या आणि मला उघड-उघड धमकी देणाऱ्या चित्रा वाघ आता शीतल म्हात्रे यांना लढण्याचा सल्ला देतायंत, हिपोक्रॅसीचीही काही सीमा असते हे या महिलेला सांगा कुणीतरी अशा शेलक्या शब्दात उर्फी जावेदने भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर टीका केलीय. 


शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून त्यांना लढण्याचा सल्ला दिला आहे. चित्रा वाघ म्हणतात की, "शितल, तू लढ. आम्ही सगळ्या तुझ्यासोबत आहोत. हा विषय फक्त शितलपुरता मर्यादीत नाहीचं, राजकारणात काम करणाऱ्या कुठल्याही महिलेसोबत भविष्यात या गोष्टी घडू शकतील. मुंबई पोलिसांना आवाहन आहे या हरामखोरांना सोडू नकाचं पण यांचा करविता धनी कोण आहे त्याला शोधून काढत त्याच्या आधी मुसक्या आवळा."


चित्रा वाघ यांच्या या सोशल मीडियावरील प्रतिक्रियेला उर्फी जावेद हिने रीट्वीट करत उत्तर दिलं आहे. ती म्हणते की, "ज्यावेळी माझ्या कपड्यांवरुन ही महिला माझ्या कॅरेक्टरवर बोट दाखवत होती ते विसरली. मला तुरुंगात टाका अशी मागणी करत होती. उघड उघड माझं डोकं फोडण्याची धमकी देत होती. वाह वाह वाह वाह... हिपोक्रॅसीची पण काहीतरी मर्यादा आहे हे या महिलेला कोणीतरी सांगा."


 






उर्फी जावेदच्या कपड्यांवरुन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या आधी तिच्यावर सडकून टीका केली होती. त्याचसोबत सार्वजनिक ठिकाणी अशा कपड्यांमध्ये वावरल्यास परिणाम भोगावे लागतील असा इशाराही तिला दिला होता. त्यानंतर उर्फी जावेदनेही चित्रा वाघ यांच्यावर टीका केली होती. सोशल मीडियावर या दोघींची जुलगबंदी पाहायला मिळाली होती. आता शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओच्या निमित्ताने पुन्हा एकदा उर्फी जावेदने चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे. 


ही बातमी वाचा: