पालघर : पालघरमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली. पालघरमधील केळवा, बहाडोली येथे पावसाने हजेरी लावली. या पावसाने शेतमालाचं नुकसान होण्याची शक्यता आहे.
अचानक पावसाचं आगमन झाल्याने जनावरांचा चारा आणि बाहेर असलेल्या साहित्याची झाका-झाक करताना शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. मात्र वाढत्या तापमानात काहीसा दिलासाही मिळाला.
दरम्यान सकाळी विदर्भातही काह ठिकाणी पाऊस झालेला पाहायला मिळाला. गडचिरोलीत सकाळी अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. अजूनही काही ठिकाणी ढगाळ वातावरण कायम असल्याने हाताशी आलेल्या पिकांवर अवकाळी पावसाचं संकट आहे.
राज्यासह देशातलं तापमान आणि हवामान वेगानं बदलत आहे. त्यामुळे मार्चच्या पहिल्या आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी, तसेच काढणीला आलेल्या पिकांची काढणी करुन आठवडाभरासाठी सावध रहावं, असं आवाहन हवामान खात्यानं केलं आहे.