पुणे: पीएपीएमएल बसने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात आयटी इंजिनिअरचा मृत्यू झाला. पिंपरीतील जगताप डेअरी चौकात सकाळी नऊच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली.
विजयकुमार स्वामी असं 24 वर्षीय आयटी अभियंत्याचं नाव आहे. विजयकुमार हा मूळचा उस्मानाबादचा रहिवासी होता.
या अपघाताप्रकरणी बसचालकाला ताब्यात घेण्यात आलं असून, सांगवी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजयकुमार हा बावधन इथल्या खासगी कंपनीत नोकरी करत होता. आज सकाळी कंपनीकडे जात असताना, जगताप चौकात भरधाव बसने त्याच्या दुचाकीला धडक दिली.
या अपघातात जखमी झालेल्या विजयकुमारला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.