Maharashtra Rain: राज्यात शुक्रवारपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. भर उन्हाळ्यात सर्वसामान्य लोकांना जरी या पावसाने काहीसा दिलासा दिला असला तरी शेतकरी मात्र अक्षरशः देशोधडीला लागण्याची शक्यता आहे. द्राक्षे, आंबा, टरबूज, संत्रा, कलिंगड, गहू, कांदा, हरभरा, काजू अशा सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्यात शुक्रवारपासून वादळी पावसासह गारपीट झाली आहे. अमरावतीतल्या मलापुर गावा शेतात काम करत असताना गोपाल करपती या शेतकऱ्याचा मृत्यू झालाय तर दोन जण जखमी झाले आहेत.
राज्यात मागील तीन-चार वर्षात दुष्काळाचं सावट काहीसे कमी झालंय आहे. पण अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे न भरून येणारे आहे. खरं तरं हा काळ रब्बीचे पिकं घेण्याचा होता. मात्र फळपिकांचे झालेलं नुकसानीने शेतकऱ्यांचा हाता तोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावून घेतला आहे.
कोकणालाही फटका
तळकोकणात सलग दोन दिवस पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा, काजू, कोकम, जाभूळ पिकांना फटका बसला आहे. अवकाळी पाऊस पडल्याने जाभूळ गळून मातीमोल झाली आहेत. तर अवकाळी पाऊस पडल्याने जाभूळ मध्ये जंतू तयार होणार त्यामुळे ते फेकून द्यावं लागणार आहे. आंब्यातही पावसामुळे जंतू तयार होण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. तसेच जील्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असल्याने जिल्ह्यातील आंबा बागायतदार चिंतातुर झाले आहेत.
अमरावती
अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील कुऱ्हा, कौडण्यापूर गावात मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील आमला, लोणी टाकळी, दहिगाव गावात चक्रीवादळ आल्याने अनेक घरावरील तीन पत्रे आणि छप्पर उडाल्याने घरातील साहित्यांच नुकसान झाले, या अवकाळी पावसामुळे मात्र काही प्रमाणात असलेला गहू, हरभरा तसेच टरबूज, कांदा, भाजीपालासह संत्रा पिकांचे मोठं नुकसान झालं आहे.
बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्यात काल दुपारपासून अवकाळी पावसाने कहर केला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने हजेरी लावली तर बुलढाणा तालुक्यात काल दुपारी गारपीट सुद्धा झाली. यात खामगाव, नांदुरा, चिखली, बुलढाणा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. तर रात्री सुद्धा मुसळधार पाऊस झाल्याने अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. बुलढाण्यासह परिसरात गारपीट झाल्याने फळ पिकांचे आणि कांदा पिकांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाल्याने संसार उघड्यावर पडले आहेत. पावसामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे.
सांगली
सांगली जिल्ह्यात झालेल्या पावसाने तासगाव तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सुनील धाबुगडे या शेतकऱ्याने बेदाण्यासाठी रॅकवर टाकलेली द्राक्षे कालच्या पावसात भिजून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तर नंदकुमार या शेतकऱ्याच्या बागेतील द्राक्ष विक्री न झाल्याने कालच्या पावसात द्राक्षचे देखील नुकसान झाले आहे. एकीकडे द्राक्षाला दर नाही आणि दुसरीकडे बेदाणा करणाऱ्यास टाकलेल्या शेतकऱ्यांवर या अस्मानी संकटामुळे आणखीन संकट वाढले आहे. दुसरीकडे महावितरण कडून वीज बिल भरण्यासाठी तगादा लावला जात आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांने लाईट बिल कसे भरावे असा प्रश्न उपस्थित करत आता सरकारने तातडीने पंचनामे करुन ठोस मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
बीड
बीड जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच अवकाळी पावसाने थैमान घातलं असून तालुक्यातील तिप्पट वाडी गावांमध्ये वीज पडून दोन बैलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. कनूर आणि बोरगाव या ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झाले आहे. तर, गहू, ज्वारी यासह आंब्याचा मोहर पूर्णपणे गळून गेला असून नव्याने लागवड केलेल्या भाजीपाल्याचं देखील प्रचंड नुकसान झालं आहे. अवकाळी पावसासह आलेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक झाड म्हणून पडली आहेत. तर शेतामध्ये गारांचा खच पडल्याने संपूर्ण शेताला तलावाच स्वरूप होतं. एक तास झालेल्या गारपिटीमुळे अनेक क्षेत्रांमध्ये पाणी साचले. तर अनेक छोट्या-मोठ्या नदी नाल्यांना पूर आला होता.
परभणी
परभणी जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झालेले असुन दुपारनंतर परभणी शहरासह जिल्हाभरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. मानवत तालुक्यातील मांडेवडगाव येथील इंदुमती नारायण होंडे या महिला शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला. या दुपारच्या सुमारास शेतात कापूस वेचणी करत असताना वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रविवारीदेखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी, बाभूळगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, मिरची, कांदा, पालेभाज्या या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली. मात्र या भागाला एका महिन्यात दोन वेळेस अवकाळी पावसाने झोडपून काढलं. त्यात गहू, चना, मिरची पिकाचं मोठ नुकसान झालं. शेतातील उभं पीक नष्ट झालं. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.