कधी रिमझिम तर कधी जोरदार स्वरूपात बरसलेल्या या पावसाचा चंद्रपूरकरांनी मनमुराद आनंद लुटला. गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर शहराच्या तापमानात वाढ व्हायला लागली होती.
चंद्रपूर शहराचं तापमान ३३ ते ३५ अंशावर पोहचलं होत. यामुळं चंद्रपूरकरांनी स्टोर रूममध्ये ठेवलेल्या कुलरच्या साफसफाई व दुरुस्तीच्या कामाला सुरवात केली होती. त्यातच सोमवारपासून चंद्रपूर शहरातील वातावरणात एकाकी बदल झाल्यानं एक दोन दिवसात अवकाळी पाऊस होण्याची चिन्हे दिसू लागली होती. हवामान खात्यानेही सर्वत्र सोमवारी अवकाळी पावसाचे संकेत दिले होते.

दरम्यान, मंगळवार दिवस उजडल्यापासून ढगाळी वातावरण कायम होतं. यासोबतच सकाळपासून थंड वारा देखील सुरु होता. त्यामुळं अवकाळी होण्याचे संकेत असतानाच दुपारनंतर एकाकी सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने बरसायला सुरुवात केली.
उन्हाळी मोसमात पडलेल्या पावसाचा अनेकांनी आनंद लुटला, तर काहींनी झाडांचा आडोसा घेतला. तास-दीड तास रिमझिम बरसलेल्या पावसानं नंतर मात्र उसंती घेतली.