बीड : पावसाळ्याच्या सुरुवातीला दुष्काळाचं सावट निर्माण झालेल्या बीड जिल्ह्यात आता अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील आठवडाभरापासून झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील कापूस, ज्वारी, तूर, बाजरी ही नगदी पिके हातची गेल्याने शेतकरी चिंतेत आहे. या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे.


दिवाळीच्या सणादरम्यान बीडसह राज्याच्या अन्य भागात अतिवृष्टी होईल, असा इशारा हवामान विभागाने व्यक्त केला होता. विशेष म्हणजे असा अंदाज अनेकदा चुकीचा ठरतो. परंतु यावेळी हा अंदाज खरा ठरला. अतिवृष्टी होणार नाही, असा अंदाज बांधलेल्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे.

यंदा पेरणीयोग्य पाऊस पडला नव्हता. तरीही मोठ्या मेहनतीने शेतकऱ्यांनी खरिपाची लागवड केली. आता पिकं काढण्याची वेळ आली होती. परंतु मुसळधार पावसामुळे होत्याचं नव्हतं झालं. हाताला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

कालच्या पावसामुळे बाजरीच्या देठाला पुन्हा अंकुर फुटला आहे. कापसाचेही तसेच बेहाल आहेत. उडीद भुईसपाट झाला आहे, तीळ कधी गळून पडले ते कळलंच नाही. तळहाताच्या फोडाप्रमाणे

ही पिकं जपली होती. परंतु परतीच्या पावसामुळे होत्याचं नव्हतं झालं आहे.