Vidarbha Weather Update : राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) दमदार हजेरी लावत एकच दाणादान उडवली आहे. मुंबईतील दादर, मुलुंड, ठाणे, बदलापूर, घाटकोपरसह अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने (Rain) एंट्री करत हाहाकार माजवला आहे. अवघे काही तास कोसळलेल्या या अवकाळी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून त्यात अनेकांचा जीव गेल्याची माहितीही आता पुढे येऊ लागली आहे.
यासोबतच या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना देखील बसला आहे. विदर्भात (Vidarbha) मागील काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने तळ ठोकला असल्याने शेतकऱ्यांचे यात अतोनात नुकसान झाले आहे. कुठे वीज कोसळून बैल जोडी ठार झाली आहे, तर कुठे उभे पीक जमीनदोस्त झाले आहे.
मिरची उत्पादकांना अवकळी पावसाचा फटका
भंडारा जिल्ह्यात धान पीक हे मुख्य उत्पादन असलं तरी आता नगदी पीक म्हणून अनेक शेतकरी बागायती शेतीच्या माध्यमातून मिरचीचं उत्पादन घेऊ लागले आहेत. मागील आठवड्यात भंडारा जिल्ह्याला अवकाळी पावसानं अक्षरश: झोडपून काढलं. या अवकाळी पावसामुळं भात पीक जमीनदोस्त झालंच तर, पालेभाज्यांच्या शेतीलाही मोठा फटका बसलाय. सोबतच मिरची पिकांचेही मोठे नुकसान झाल्याचं चित्र भंडारा जिल्ह्यात बघायला मिळतंय.
लाखोंची मिरची सडली
भंडारा आणि लगतच्या परिसरातील ज्या मिरची उत्पादकांनी मिरचीचं उत्पादन घेतलं किंवा त्या मिरची विक्रीतून ज्या व्यापाऱ्यांनी व्यवसाय करण्याकरिता मिरची खरेदी केली, अशांना या अवकाळी पावसाचा जबर फटका बसलाय. किंबहुना अचानक आलेल्या या पावसामुळं मिरची सडली आणि आता या मिरचीला मार्केटमध्ये दर ही मिळणार नाही, अशी भीती आता व्यक्त होत आहे. छोटे व्यापारी किंवा शेतकऱ्याचा विचार केल्यास या अवकाळी पावसामुळं त्यांना पाच ते दहा लाख रुपयांचा फटका बसल्याचं बघायला मिळत आहे. त्यामुळे शेतकाऱ्यांसह व्यापारी वर्गाचेही या अवकाळी पावसाने मोठे नुकसान केल्याचे चित्र आहे.
वीज कोसळून बैल जोडी ठार
यवतमाळच्या झरी तालुक्यातील मार्की (बु.) येथील दिवाकर रामदास ढेंगळे यांच्या शेतात वीज कोसळून दोन बैल ठार झाल्याची घटना समोर आली आहे. दिवाकर यांनी त्यांच्या शेत शिवारात वादळी वारा आणि पाऊस आल्याने झाडाचा आसरा घेण्यासाठी लिंबाच्या झाडाच्या खाली आपल्या बैलला बांधून ठवले होते. दरम्यान, बांधून असलेल्या बैलावर वीज पडली आणि त्यात या दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला आहे.
हवामान विभागाचा'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी
राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) जोर चांगलाच वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने अचानक एंट्री केल्याने सर्वत्र एकच दाणादान उडाली आहे. तर त्याचा फटका हा शेतकऱ्यांना देखील बसतो आहे. अशातच विदर्भात सलग कोसळणाऱ्या या अवकाळी पावसासह सोसाट्याच्या वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचा तोंडाचा घास हिरावला आहे. अचानक कोसळलेल्या या पावसाचा सर्वाधिक फटका हा सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांनाही बसला आहे.
तर आज 14 मे ते 16 मे दरम्यान विदर्भातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपीट, विजांच्या कडकडाटास 40-50 प्रतितास सोसाट्याचा वारा येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर आजपासून पुढील 16 मे पर्यंत विदर्भातील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या