Kolhapur News : महिला व बाल विकास अधिसूचना 2022 नुसार दत्तक इच्छुक पालकांनी www.cara.nic.com या या वेबसाईटवर देशांतर्गत, देशाबाहेरील, नात्यांतर्गत त्याचबरोबर देशांतर्गत व देशाबाहेरील नात्यांमधील बालकास दत्तक घेण्याबाबत नोंदणी करावी. नोंदणी न करता घेतलेले दत्तक बालक हे अवैध दत्तक प्रक्रिया ठरविली जाईल. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 व दत्तक नियमावली 2017 नुसार शिक्षेस पात्र ठरतील, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली आहे. 


केंद्र शासनाच्या नव्या मार्गदर्शक सूचनांन्वये जिल्ह्यातील जिल्हा परिवीक्षा अनुरक्षण संघटना संचलित शिशुगृह, कोल्हापूर येथील बालिकेचे बाल दिनी जिल्ह्यातील बाळ दत्तक देण्याचा पहिला आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या सुनावणीनंतर पारित करण्यात आला. महिला व बाल विकास अधिसूचना दि. 23 सप्टेंबर 2022 नुसार आंतरदेशीय व देशांतर्गत दत्तक विधानाचे सर्व अधिकार जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आले आहेत.


दत्तक इच्छुक पालकांनी www.cara.nic.com या पोर्टलवर रजिस्ट्रेशन करुन दत्तक ग्रहणासंबंधी ऑनलाईन पध्दतीने पालकांना बाल कल्याण समितीच्या आदेशान्वये दत्तकमुक्त झालेले बालक दाखविण्यात येते. त्यानंतर पालक, संस्था अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांची दत्तक समितीची बैठक घेण्यात येते. यावेळी पालकांची सर्व कागदपत्रे तपासणी करण्यात येतात व दत्तक इच्छुक पालकांनी बालकासंबंधी पसंती दर्शविल्यानंतर संबंधित संस्था ही जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांना दत्तक प्रकरणाची पुढील कार्यवाही करण्याबाबत अर्ज सादर करते. 


त्यानुसार जिल्हा बाल संरक्षण कक्ष हे पालकांच्या कागदपत्रांची छाननी करुन जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सुनावणीसाठी सादर करते. सुनावणीनंतर जिल्हाधिकारी हे दत्तक प्रक्रिया पूर्ण झाल्याबाबत आदेश पारित करतात. अशा पध्दतीने दत्तक प्रक्रिया पूर्ण केली जाते. दत्तक प्रक्रियेचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्याचा निर्णय चांगला आहे. त्यातून ही प्रक्रिया अधिक गतीने होवू शकते. दत्तक इच्छुक पालक हे www.cara.nic.com या पोर्टलवर नोंदणी करुन बालक दत्तक घेवू शकतात, अशी माहिती  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी दिली.


दि. 14 ते 21 नोव्हेंबर या दत्तक सप्ताहामध्ये जिल्ह्यामध्ये दत्तक विधान प्रक्रियेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. यामध्ये छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, कोल्हापूर व इतर प्रसुती रुग्णालयामध्ये दत्तक विधान प्रकियेची जनजागृती करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सागर दाते यांनी दिली.


इतर महत्वाच्या बातम्या