पंढरपूर : विठ्ठल मंदिर परिसर , चंद्रभागेचे सर्व घाट , प्रदक्षिणा मार्गाला जोडणारे रस्ते आणि मंदिर परिसरातील प्रस्तावित माउली कॉरिडॉर यामुळे शेकडो नागरिक , व्यापारी यांच्या घरादारावर बुलडोझर फिरणार असल्याने या आराखड्यास तीव्र विरोध होऊ लागला असून नागरिकांनी याच्या विरोधात विठ्ठल बचाव संघर्ष समिती स्थापन केली आहे . पंढरपूर कॉरिडॉर आणि विकास आराखडा हा नागरिकांना पाहणीसाठी 17 नोव्हेंबर पर्यंत ठेवण्यात आला असून याला आक्षेप नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे . विकास आराखडा राबविताना नागरिकांना विश्वासात घेतले जाणार असल्याची भूमिका प्रशासन बोलून दाखवत असले तरी हे सर्व आराखडे शासनाकडे सादर केल्याने नागरिकात भीतीचे वातावरण आहे. या लढ्यात आता मनसेने उडी घेतली असून या आराखड्याच्या विरोधात मुंबई उच्य न्यायालयात दाद मागण्याची तयारी सुरु केल्याचे मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी जाहीर केले आहे . या आराखड्याच्या विरोधात ज्या नागरिकांना न्यायालयात जायचे आहे त्यांचा सर्व खर्चही मनसे कडून केला जाणार असून हा अन्यायकारक आराखडा मागे घ्या अशी मागणी केली आहे.


विठ्ठल मंदिर परिसरातील चौफाळा ते महाद्वार घाट हा माउली कॉरिडॉर हा खरा वादाचा मुद्दा असून मंदिर परिसरातील रस्ते थेट 200 फुटापर्यंत वाढवण्याचे नियोजन प्रशासन करत आहे . सध्या मंदिर परिसरात केवळ 60 फुटांचे रस्ते असून अजून जवळपास 140 फूट रुंदी वाढल्याने केवळ या कॉरिडॉरमुळे जवळपास एक हजारापेक्षा जास्त नागरिकांची घरे आणि दुकाने जमीनदोस्त होणार असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत . वास्तविक मंदिर परिसरात यापूर्वी 1982 साली रास्ता रुंदीकरण करण्यात आले होते . मात्र भाविकांची वाढती संख्या आणि अपुरे पडणारे रस्ते यामुळे काशीच्या वाराणशी कॉरिडॉरच्या धर्तीवर हा माTली कॉरिडॉर करायचे प्रस्तावित आहे . या कॉरिडॉरमध्ये महाद्वार घाटावरील श्रीमंत अहिल्यादेवी होळकर  आणि शिंदे सरकार यांच्या पुरातन आणि ऐतिहासिक वास्तू देखील बाधित हा कॉरिडॉर मंदिर परिसरात न करता चंद्रभागा वाळवंट अथवा 65 एकर भक्ती सागर याठिकाणी करावा अशी नागरिकांची भूमिका आहे.
 
 या आराखड्यात मंदिर परिसरातील एकूण 39 रस्ते मोठे होणार असून सध्या हे रस्ते केवळ 1 ते 3 मीटर आहेत त्याची रुंदी 6 ते 12 मीटर पर्यंत करायचे प्रस्तावित असल्याने यामध्ये हजारोंच्या संख्येने नागरिकांना विस्थापित व्हावे लागणार आहे . यामधील  रस्ते हे शहराच्या डेव्हलपमेंट प्लॅनमधील असल्याने पालिकेने आता या भागातील नागरिकांच्या घरावर मार्किंग करण्यास सुरुवात केली जाणार असल्याचे मुख्याधिकारी अनिकेत माली यांनी सांगितले . या रस्त्यांपैकी 22 रस्ते सुरुवातीला हाती घेण्यात येणार असून यात चंद्रभागा नदीकडे जाणाऱ्या सर्व नऊ घाटांच्या रस्त्यांचे रुंदीकरण होणार आहे . याशिवाय मंदिराला जोडणारे सर्व रस्त्यांचा यात समावेश असून यात हरिदासांचा काल्याचा वाडा असे वारकरी संप्रदायाच्या जिव्हाळ्याच्या काही ऐतिहासिक वास्तूंचा समावेश आहे. 


  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी आल्यावर पंढरपूर कॉरिडॉरची घोषणा केली होती. आता नागरिकांच्या तीव्र विरोधानंतर शिंदे फडणवीस सरकार काय भूमिका घेणार याकडे बाधित होणारे हजारो नागरिक डोळे लावून बसले असले तरी या आराखड्याच्या पाहणीसाठी आलेल्या अपर सचिव सुजाता सौनिक यांनी दिलेल्या संकेतानुसार हा आराखडा राबविण्यावर शासन ठाम असल्याचे दिसत आहे. आता नागरिकांनी याविरोधात बचाव समिती स्थापन करून तीव्र  विरोध करायची भूमिका घेतली असताना मनसे कडून मुंबई उच्य न्यायालयात लढाईची तयारी सुरु केली आहे . एकंदर सर्वसामान्य वारकऱ्याला सुविधा देताना स्थानिकांच्या घरादारावर नांगर फिरवणे कितपत योग्य असा सवाल पंढरपूरकर विचारू लागले आहेत .