मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन 5.0 ची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनचा पाचवा टप्पा फक्त कटेंनमेंट झोनपुरताच मर्यादित असणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच 3 जूनपासून या लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात येणार होती. त्यासंबंधीची नियामावली राज्य सरकारकडून आज जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार 'मिशन बिगिन अगेन'च्या पहिल्या टप्प्यात काही प्रमाणात सूट देण्यात आल्या आहेत.


राज्यातील दुकानं ऑड इव्हननुसार सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. रस्त्याच्या एका बाजूची दुकानं एक दिवशी तर दुसऱ्या बाजूची दुकान एक दिवशी उघडण्यात परवानगी देण्यात आली आहे. यावर पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाची नजर असणार आहे. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे बंधनकारक असणार आहे.


खासगी कार्यालयांनाही या नियमावलीत सूट देण्यात आली आहे. खासगी कार्यालयं 10 टक्के किंवा 10 कर्मचारी घेऊन काम सुरु करु शकतात. उरलेल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करावं लागणार आहे. येत्या 8 जूनपासून हा निर्णय लागू होणार आहे.





मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला त्यावेळी सांगितलं होतं की पुढच्या रविवारपासून वृत्तपत्र घरपोच मिळतील. त्यानुसार रविवारपासून वृत्तपत्र घरपोच देण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र मुलांच्या स्वच्छतेबाबतची जबाबदारी घेणे बंधनकारक असणार आहे.


विद्यापीठ, शाळा, कॉलेजमधील कर्मचारी विद्यार्थ्यांना शिकवण्याऐवजी ई-कंटेट विकसित करणे, उत्तर पत्रिकांचं मुल्यमापन करणे, निकाल जाहीर करण्याची काम करु शकतात. मुंबई महानगर प्रदेशात प्रवासासाठी कोणतेही निर्बंध नसणार आहेत. मात्र आंतरराज्य आणि आंतरजिल्हा प्रवास करणाऱ्यांवर नजर ठेवली जाणार आहे.