नाशिक : व्हॉट्सअॅपवर फोटो शेअर करणं नाशिकमधील तरुणीला महागात पडलं आहे. अनोळखी व्यक्तीला फोटो शेअर केल्याने 20 वर्षीय तरुणीला ब्लॅकमेलिंगला सामोरं जावं लागलं.

काय आहे प्रकरण?

पीडित तरुणीने एका व्यक्तीला काही महिन्यांपूर्वी आपला फोटो व्हॉट्सअॅपद्वारे शेअर केला होता आणि त्यानंतर तो तरुण तिला वांरवार फोन करुन त्रास देऊ लागला. पीडित तरुणीने त्याकडे दुर्लक्ष करताच, त्याने तरुणीचा चेहरा असलेले अश्लील फोटो तयार केले आणि तरुणीला व्हॉट्सअॅपवर पाठवले.

विशेष म्हणजे, एवढ्यावरच न थांबता आरोपीने हेच फोटो पीडित तरुणी काम करत असलेल्या संस्थेतील तिच्या मैत्रिणींना देखील पाठवले. त्यानंतर आरोपीने 7 ते 8 वेगवेगळ्या मोबाईल नंबरद्वारे फोन करुन पीडित तरुणीला शिवीगाळ केली.

हा सगळा प्रकार हाताबाहेर गेल्याचं लक्षात आल्यानंतर, पीडित तरुणीने सायबर पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी माहिती आणि तंत्रज्ञान अधिनियम कायद्याअंतर्गत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आता आरोपीचा शोध घेत आहेत.

सोशल मिडीयाचा अशाप्रकारे गैरवापर होत असल्याच्या अनेक घटना वारंवार समोर येत आहेत. फेसबुक, ट्विटर किंवा व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियाचा वापर अत्यंत जबाबदारीने करणे गरजेचं असल्याचेही अशा प्रकारांमधून लक्षात घ्यायला हवे.