लहान असताना मामाच्या गावची मुलगी करण्याची इच्छा होती. कारण तशी पद्धत आहे. पण माझ्या नशिबात हा योग नाही. या गोष्टीला 50 वर्ष झाल्यामुळे त्याचा काही उपयोग नाही. मामाच्या गावाला यायला खूप उशीर झाला आणि आता ते शक्यही नाही, असं पवार म्हणताच एकच हशा पिकला.
दारादारात रांगोळ्या... घराघरांवर गुढ्या... रस्त्यात फुलांचा सडा... आणि झांजपथक... गोलिवडे हे शरद पवार यांचं आजोळ आहे. जेमतेम अडीच ते तीन हजार लोकवस्ती, मात्र या गावाचा संबंध शरद पवार यांच्याशी असल्यामुळे या गावातल्या प्रत्येक ग्रामस्थाला अभिमान आहे. शरद पवार यांच्या आई शारदाबाई...
शरद पवार यांचं गोलिवडे गावात आगमन होताच झांज पथकाच्या नादात त्यांची मिरवणूक काढण्यात आली. गावातील महिलांनी त्यांचं औक्षण केलं आणि ते व्यासपीठावर आले. हिरव्या साड्या परिधान केलेल्या महिला आणि फेटे घातलेले गावकरी शरद पवारांकडे डोळे भरुन पाहत होते.
कोल्हापुरात ज्याची सुरुवात, त्या गोष्टी देशात पोहचतात : पवार
गावाच्या वतीने शरद पवार यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना शरद पवार हे भारावून गेले होते. गोलिवडे गावाचा आपल्या आईचा ऋणानुबंध सांगत गावाशी असलेले नातेसंबंध उलगडले. तसेच आपल्या आईच्या अनेक आठवणींना पवारांनी उजाळा दिला.
गोलिवडे गावात यंदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यातच महिला सरपंचाची निवड देखील बिनविरोध करण्यात आली आहे. खरंतर या ग्रामपंचायतीचा आदर्श राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने घेतला पाहिजे. तसंच जिथं महिलेच्या हातात कारभार असतो तिथला कारभार नेहमीच नीट होतो, असं शरद पवारांनी सांगितलं आहे. तसंच समाज समृद्धीच्या स्तरावर न्यायचा असेल तर घरातील प्रत्येक स्त्री ही शिकली पाहिजे असं शरद पवारांनी म्हटलं. कर्तृत्वाचा मक्ता हा पुरुषाबरोबर महिलेकडे असतो हे विसरुन चालणार नसल्याचं पवारांनी सांगितलं.
आपल्या गावाचा नातू हा देशाच्या सर्वोच्च पदावर पोहचावा आणि ते लवकरात लवकर पंतप्रधान व्हावे म्हणून गोलिवडे ग्रामस्थांनी ग्रामदेवतेला साकडं घातलं आहे. तसंच शरद पवार यांच्या भेटीने गावचं नाव जगाच्या नकाशावर आल्याची भावना व्यक्त केली.
गेली अनेक वर्षे शरद पवार आपल्या आजोळी गोलिवडे या गावी यावेत यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. आज शरद पवार यांनी ग्रामस्थांची इच्छा पूर्ण करत आज आपल्या आजोळी भेट दिल्याने गावाने जणू सण साजरा केल्याचा आनंद आहे.