ठाणे : ठाणे पोलीस दलातील पहिले COVID-19 आजाराने बाधित झालेले वरिष्ठ पोलीस अधिकारी पूर्णतः बरे होऊन ठाण्यात सोमवारी (27 एप्रिल) परतले. यामुळे ठाणे पोलीस दलात आनंद पसरला होता. ते येणार ही बातमी कळताच ठाणे पोलीस दलातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी त्यांचे स्वागत करण्यासाठी ठाण्याच्या वेशीवर गेले होते. फुले उधळून आणि टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत करण्यात आले.


मुंब्रा पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला सर्वात आधी COVID-19 ची बाधा झाली होती. इथूनच ठाणे पोलीस दलात कोरोना व्हायरसचा शिरकाव झाला. या पोलीस ठाण्यात एकूण सात पोलिसांना कोविड 19 झाला असल्याने पोलिसात खळबळ पसरली होती. यानंतर खबरदारी म्हणून एकूण 40 पोलीस कर्मचाऱ्यांना होम क्वॉरन्टाईन करण्यात आले होते. त्यापैकी एक सहाय्यक निरीक्षक गेल्या आठवड्यात पूर्ण बरे होऊन घरी परतले. त्यानंतर सोमवारी वरिष्ठ अधिकारी देखील पूर्ण बरे झाल्याने ठाणे पोलिसात आनंदाचे वातावरण होते.


या वरिष्ठ अधिकऱ्याला सर्वात आधी कोविड 19 ची बाधा झाल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर त्यांच्यावर नाशिक इथे उपचार सुरु होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. शेवटी त्यांना अंधेरी येथील रुग्णालयात दाखल केले गेले. तिथे त्यांच्यावर उपचार झाल्याने ते काल पूर्ण बरे होऊन ठाण्यात परतले. यावेळी त्यांचे जंगी स्वागत ठाणे पोलिसांनी केले. अनेक वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यावेळी हातात फुले घेऊन उभे होते. फुलांची उधळण त्या अधिकाऱ्यावर करण्यात आली. टाळ्या वाजवण्यात आल्या. हे सर्व पाहून हा अधिकारी अतिशय भारावून गेला. त्यांच्या डोळ्यात अश्रू देखील तरळले. आता 14 दिवस त्यांना क्वॉरन्टाईनमध्ये राहावे लागणार आहे.