मुंबई : राज्यात काही दिवसांवर महानगरपालिकेच्या निवडणुका ठेपल्या आहेत. येत्या काही महिन्यांमध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत, परंतु त्याआधी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (Raj Thackery- Nitin Gadkari Meet) भेटीला गेले. राज ठाकरे आणि नितीन गडकरी यांच्यात दोन तास भेट झाली. ही राजकीय भेट नव्हती, व्यक्तिगत आणि कौटुंबिक भेट असल्याची गडकरींनी माहिती दिली. भाजप-मनसे युतीच्या चर्चा सुरु असताना गडकरी आणि राज ठाकरेंची भेट महत्त्वाची मानली जाते. काल गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी भाजपला सॉफ्ट कॉर्नर देत महाविकास आघाडीला टार्गेट केलं होतं.
मुंबईतील शिवाजी पार्कवरील गुढीपाडवा मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. राज ठाकरेंच्या या टीकेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजप नेत्यांनी समर्थन केले होते. त्यानंतर आज नितीन गडकरी आणि राज ठाकरेंची ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. त्यामुळे या भेटीनंतर मनसे-भाजप युतीच्या चर्चेला उधाण आले आहे.
या अगोदर काही महिन्यांपूर्वी भाजप नेत्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यावेळी देखील मनसे-भाजप युतीच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, काही मुद्द्यावर एकमत न झाल्यामुळे युतीची चर्चा फिसकटल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.
2019 मध्ये शिवसेना आणि भाजप यांची युती तुटली. शिवसेनेनं साथ सोडल्यानंतर भाजप नव्या मित्रपक्षासोबत युती करण्यास उत्सुक आहे. भाजपा आणि मनसे युती होऊ शकते, अशी चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरु आहे. या युतीचा पहिला प्रयोग मुंबई महापालिका निवडणुकीत होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. मराठीचा मुद्दा लावून धरणाऱ्या मनसेने गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्वाची वाट धरल्याचेही पाहायला मिळालं. भाजपही हिंदुत्वाच्या विचारसरणीला मानणारा पक्ष आहे. त्यामुळे हिंदुत्व दोन्ही पक्षांना जोडणार समान धागा आहे. राजकारणात काहीही अशक्य नसतं, त्यामुळे भविष्यात या दोन पक्षांमध्ये युतीची शक्यता नाकारता येत नाही.