मुंबई : कल्याण डोंबिवली (Kalyan Dombivli) महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची अवस्था अतिशय दैनिय आहे. स्थानिकांनी यावर वेळोवेळी आवाज उठवलाय. परंतु, परिस्थिती जैसे थे आहे. आज केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur ) यांनीच येथील खराब रस्ते पाहून आपण हैराण असल्याचे म्हटले. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची अवस्था पाहून अनुराग ठाकुर यांनी लोकप्रतीनींजवळ थेट नाराजी व्यक्त केली. अनुराग ठाकूर यांचा सध्या कल्याण लोकसभा मतदार संघाचा दौरा सुरू आहे. 


अनुराग ठाकूर यांनी आज कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात भेट दिली. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे, आमदार गणपत गायकवाड, आमदार निरंजन डावखरे आणि महापालिका अधिकारी उपस्थित होते. यावेळी अनुराग ठाकूर यांनी पालिका मुख्यालयातील स्मार्ट सिटीच्या कार्यालयाला भेट देत तेथील  यंत्रणेचा आढावा घेतला. यावेळी अनुराग ठाकूर यांनी रस्त्यांची अवस्था खूप खराब आहे, ही स्मार्ट सिटी आहे हे एकूण हैराण झालो अशा शब्दात नाराजी व्यक्त केली. ज्या ठिकाणी स्मार्ट सिटी राबवण्यात आली तिथे आणि इथे खूप फरक आहे.  मला कळलं की जेव्हा ही स्मार्ट सिटी आहे तेव्हा मीच हैराण झालो असे ठाकूर म्हणाले.
 
अधिकारी काळा तलाव बोलताच मंत्री रवींद्र चव्हाण संतापले  
दरम्यान, स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या कल्याण पश्चीमकडील तलावाच्या सुशोभीकरनाची माहिती देताना अधिकाऱ्यांनी काळा तलाव असा उल्लेख करताच रवींद्र चव्हाण त्यांच्यावर चांगलेच संतापले. संबधित अधिकाऱ्यांना हा भगवा तलाव आहे असे सांगत, परत परत नका अशा चुका करू नका, निवृत्ती जवळ आली आहे असे सुनावले. त्यानंतर अनुराग ठाकूर यांनी, मोदीजी कहते हैं ना गुलामी किं सोच से बाहर निकलो, निकलना मुश्किल होता हैं असे अधिकाऱ्यांना उद्देशून आमदार गणपत गायकवाड यांना सांगितलं. 


कल्याण पश्चिमेकडील काळा तलावाचे नाव भगवा तलाव करण्यात यावे अशी शिवसेना भाजपची मागणी आहे. या तलावात शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी भगवा तलाव असेच संभोधतात. मात्र आज अधिकाऱ्यांनी काळा तलाव असे बोलताच मंत्री रवींद्र चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.


दरम्यान, महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी कल्याण-डोंबिवली भागातील रस्त्याच्या कामांची पाहणी करून तीन दिवसात खड्डे बुजवा, एका रस्त्यासाठी तीन पथके तयार  करा, लवकरात लवकर खड्डे बुजवा अन्यथा तुम्हाला ब्लॅकलिस्ट करू. ब्लॅकलिस्ट केले तर पुन्हा कल्याण डोंबिवलीत काम मिळणार नाही असा इशारा ठेकेदारांना दिला होता. परंतु, अजूनही अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण झालेली आहे.