तो परतला... सीमेवर तैनात झाला... दिवाळीत तुमच्या आमच्या घरी दिवे लागले. पण दिवाळी संपताच... त्याच्या घरी आक्रोशाची चिता पेटली.
कोल्हापूरच्या कारवेचे राजेंद्र तुपारे शहीद झाल्याची बातमी आली आणि गावाची रौनकच गेली.
आयटीआय झालेले राजेंद्र 2002 साली बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये भरती झाले. गेल्या 14 वर्षांपासून कधी सीमेवर, तर कधी बेळगावमध्ये त्यांची बदली होत राहिली. लष्करातल्या सेवेची अवघी दीड वर्षे त्यांची बाकी होती... पण त्याधीच ते देशाच्या कामी आले.
ज्या मैदानात राजेंद्र घडला, त्याच मैदानात त्याला निरोप देण्याची तयारी झाली. पण एका डोळ्यात अश्रू आहेत... दुसऱ्या डोळ्यात आग.
मी पण एक सैनिक आहे... आम्हाला फक्त आदेश द्या... पाकिस्तानवर कब्जा करण्याची आमची ताकद आहे, असं राजेंद्रच्या गावातील दुसरा जवान म्हणतो.
राजेंद्रचं कुटुंबच समाजसेवी. गावातील कॉलेजची जागाही त्याच्याच कुटुंबानं दिलेली. राजेंद्र इतका गुणी... की त्याच्या कहाण्या... शाळेत सांगितल्या जायच्या..
कबड्डीमध्ये तो तरबेज होता... एकदा गेला... की चार जणांना घेऊन यायचा, अशी आठवण क्रीडा शिक्षक सांगतात.
तो वृक्षारोपणसारखे कार्यक्रम घ्यायचा, आजही त्यानं लावलेलं झाड दिमाखात उभं आहे.
चंदगडच्या तांबड्या मातीनंच राजेंद्रच्या रक्तात शौर्याची रग भरली होती. तो कायम देशसेवेच्याच गोष्टी करायचा... काय करणार... या गावालाच शौर्याची परंपरा लाभली आहे.
खरं तर राजेंद्र पुढच्या वर्षी निवृत्त होऊन गावी परतला असता. पण कदाचित देशासाठी प्राणार्पण करणं हेच त्याच्या आयुष्याचं धेय होतं... मागं म्हातारी आई, पत्नी आणि दोन गोंडस पोरं तो सोडून गेला... पण मनात देशभक्तीची मशाल पेटवून.