परभणी: मराठवाड्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा फटका राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनाही बसला आहे. व्याख्यानाच्या कार्यक्रमासाठी उज्ज्वल निकम हे परभणीला आले होते. त्यावेळी त्यांनी औरंगाबाद ते परभणी प्रवास केला. या मार्गावरील खड्ड्यांमुळे उज्वल निकम यांना कार्यक्रमाला येण्यास विलंब झाला, ज्याची नाराजी त्यांनी भाषणातून व्यक्त केली.


परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात 'युवकांची सामाजिक जबाबदारी आणि भविष्यातील आव्हानं' या विषयावर उज्वल निकम यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रवासादरम्यान त्यांना मराठवाड्यातील रस्त्यांची परिस्थिती कळली.

'एवढे खराब रस्ते असतील याची कल्पना ही केली नव्हती', अशी खंत उज्ज्वल निकम यांनी बोलून दाखवली. याबाबत आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशीही बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेवटी खड्डेमय रस्त्याच्या प्रवासातून वाचण्यासाठी त्यांनी रेल्वेने मुंबईला जाणं पसंत केलं.

या कार्यक्रमादरम्यान उज्वल निकम यांच्यातील मृदु कवि परभणीकरांनी अनुभवला. व्याख्यानाला उशिर झाला हा सूर पकडत अॅड निकम यांनी उपस्थित विद्यार्थांची मानसिकता हेरत कविता सादर केल्या. महाविद्यालयीन काळ, प्रेयसी आणि बायको यांच्यावरील कवितांमुळे सभागृहातील वातावरण आल्हाददायक बनले. त्यांच्या कवितांमुळे कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांच्यासह उपस्थित पाहूणे, प्रेक्षक व विद्यार्थींमध्ये हस्यकल्लोळ पसरला.

शेवटी उज्वल निकम यांच्या दौऱ्यामुळे मराठवाड्यतील खड्डेमय रस्त्यांचा प्रश्न पून्हा ऐरणीवर आला आहे.