नागपूर : OLX सारख्या ऑनलाईन साईटवरुन महागडे कॅमेरे भाड्याने घेत ते परस्पर विकणाऱ्या आणि गहाण ठेवणाऱ्या दोन महाविद्यालयीन तरुणांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. वैभव हर्ष आणि अक्षय वंजारी या आरोपी तरुणांकडून पोलिसांनी आठ लाख रुपयांचे 17 डीएसएलआर कॅमेरे जप्त केले आहेत. वैभव हा पदवी शिक्षण घेत आहे तर अक्षय बारावीत शिकतो.
OLX सारख्या साईट्सवर महागड्या वस्तू भाड्याने देण्याची नवीन पद्धत सुरु करण्यात आली आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू भाड्याने देण्या-घेण्याचा ट्रेंड वाढत आहे. मात्र अशा साईट्सवर अनोळखी व्यक्तींना आपले महागडे इलेक्ट्रॉनिक साहित्य भाड्याने देताना दाखवलेली बेपर्वाई किती महागात पडू शकते, हे नागपुरात समोर आलं आहे.
19 वर्षीय वैभव हर्ष आणि अक्षय वंजारी हे दोघेही OLX साईटवरुन कॅमेरे भाड्याने आणायचे. मात्र दोघांनीही कॅमेरा कधीही परत केला नाही. या संदर्भात पोलिसांकडे तक्रारींचा ओघ वाढल्यानंतर नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपास सुरु केला.
गुन्हे शाखेने वैभव हर्षला ताब्यात घेऊन चौकशी केली त्यावेळी त्याने आपला सहकारी अक्षयच्या मदतीने कॅमेरे भाड्याने घेतल्याचं कबूल केलं. हे कॅमेरे परस्पर गहाण ठेऊन त्यातून मिळालेले पैसे जुने कर्ज फेडण्यासाठी वापरल्याची माहिती दोघांनी पोलिसांना दिली.
काही महिन्यांपूर्वी वैभवने स्वतःच्या वाढदिवसाचे फोटो काढण्याठी एका मित्राचा कॅमेरा आणला होता. मात्र दुर्दैवाने तो कॅमेरा हरवल्याने मित्राला 80 हजार रुपये भरुन द्यावे लागले होते. ते पैसे जमवण्यासाठी वैभवने अक्षयच्या मदतीने OLX साईटवरुन महागडे कॅमेरे भाड्याने घेऊन ते परस्पर विकणे आणि गहाण ठेवण्याचा धंदा सुरु केला.
OLX वर महागडे कॅमेरे भाड्याने घेऊन विकणारे कॉलेज विद्यार्थी अटकेत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Nov 2018 03:02 PM (IST)
19 वर्षीय वैभव हर्ष आणि अक्षय वंजारी हे दोघेही OLX साईटवरुन कॅमेरे भाड्याने आणायचे. मात्र दोघांनीही कॅमेरा कधीही परत केला नाही
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -