मुंबई : विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी देण्याबाबत चर्चा सुरु आहेत. निकम यांना जळगाव मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीच्या गोटातून सुरु आहेत, अशी माहिती समोर येत आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाच्या प्रमुख नेत्यांची आज मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत उज्ज्वल निकम यांच्या नावाची चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र याबाबत उज्ज्वल निकम यांना विचारलं असता त्यांनी मौन बाळगणचं पंसत केलं.

आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण जोर लावून भाजपला कडवं आव्हान देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. राज्यातील प्रतिष्ठित आणि समाजात चांगली प्रतिमा असलेल्या व्यक्तींना उमेदवारी देण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे उज्ज्वल निकम यांना जळगावातून उमेदवारी देण्याबाबतचा प्रस्ताव पुढे आल्याचं समजतं.

उज्ज्वल निकम यांच्या उमेदवारीबाबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना विचारलं असता त्यांनी याबाबत कल्पना नसल्याचं म्हटलं आहे. उज्ज्वल निकम यांची सामाजिक प्रतिमा चांगली आहे. ते राजकारणात येतील का हे माहित नाही. मात्र ते येत असतील तर त्यांच स्वागत आहे, असं छगन भुजबळ म्हणाले.