मुंबई: शिवसेना नेमकी कुणाची, धनुष्यबाण ठाकरेंना मिळणार की शिंदे गटाचा याचा निर्णय आजही लागला नाही. यासंबंधीची सुनावणी सध्या केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुरू असून पुढील सुनावणी आता शुक्रवारी म्हणजे 20 जानेवारीला होणार आहे. आज झालेल्या सुनावणीनंतर आता जेष्ठ वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
धनुष्यबाण कायमचं गोठवू शकते...
उज्ज्वल निकम म्हणाले की, निवडणूक आयोगाला फक्त पक्षाची घटना आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी कोणाच्या बाजूचे आहेत ही बाब तपासावी लागेल. या सगळ्या प्रक्रियेला जर वेळ लागत असेल तर कदाचित केंद्रीय निवडणूक आयोग शिवसेनेचे राजकीय चिन्ह धनुष्यबाण हे कायमचं गोठवू शकते, तशी शक्यता आहे.
उज्ज्वल निकम म्हणाले...
- केंद्रीय निवडणूक आयोगासमोर ज्यावेळी एखाद्या राजकीय पक्षाचे राजकीय चिन्ह किंवा त्या राजकीय पक्षाच्या चिन्हाबाबत प्रश्न उपस्थित होतो, त्यावेळी निवडणूक आयोग प्रामुख्याने त्या पक्षाची घटना तपासते. राजकीय पक्षाची घटना निवडणूक आयोगाकडे रजिस्टर झालेली असते. त्या घटनेनुसार त्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी निवडून आले आहेत का? ते कोणाच्या बाजूने आहेत?, ही बाब केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तपासली जाते.
- त्या राजकीय पक्षाचे आमदार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी हे कोणत्या गटाचे आहेत हे देखील तपासले जाते. केंद्रीय निवडणूक आयोगापुढे दोन्ही गटातून अनेक प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आली आहेत. त्या प्रतिज्ञापत्रात दावे प्रतिदावे देखील तपासले जातात. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाला निश्चितपणे ही बाब तपास करावी लागेल की, हे प्रतिज्ञापत्र खरे आहे की खोटे आहेत. त्यात सत्याचा लवलेश किती आहे?
- त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेला काही कालावधी लागू शकतो.
- शिवसेना पक्षांच्या काही आमदारांची अपात्र विषय हा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही बाब स्पष्ट केली आहे की शिवसेना राजकीय पक्षाचे निवडणूक चिन्ह कोणाला असावं याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग घेईल. त्यामुळे त्या सोळा आमदारांची पात्रता किंवा अपात्रता हा निवडणूक आयोगापुढचा विषय राहणार नाही.
- केंद्रीय निवडणूक आयोगाला फक्त पक्षाची घटना आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी कोणाच्या बाजूचे आहेत ही बाब तपासावी लागेल. या सगळ्या प्रक्रियेला जर वेळ लागत असेल तर कदाचित केंद्रीय निवडणूक आयोग शिवसेनेचे राजकीय चिन्ह धनुष्यबाण हे कायमचं गोठवू शकते. त्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही.
ही बातमी वाचा: