सोलापूर : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणारे उजनी धरण  (solapur Ujani dam) आज रात्री उशिरा 100 टक्के भरले आहे. आता परतीचा पाऊस संपल्याने धरण प्रशासनाने धरण 111 टक्के भरून घेण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या पद्धतीने हवामान खात्याने सोलापूर जिल्ह्यात चार दिवस पावसाचा अंदाज दिला आहे. त्यानुसार पाऊस सुरु असल्याने पुढील दोन दिवसात उजनी 111 टक्के पर्यंत भरण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे.  पुणे, सोलापूर , नगर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांची तहान भागविणाऱ्या उजनी धरणाला यंदा भरण्यासाठी काहीसा उशीर झाला. उजनी धरण यावर्षी कमी पावसामुळे कसे भरणार याची चिंता बळीराजाला लागली होती मात्र परतीचा पाऊस आणि वादळामुळे आलेल्या पावसाने उजनी धरणाने शंभरी गाठली आहे. यंदा पश्चिम महाराष्ट्रातील पाऊस मराठवाड्याकडे गेल्याने कायम पश्चिम महाराष्ट्रातील बळीराजा चिंताग्रस्त होता. आता उजनी धरण भरल्याने हि चिंता मिटली आहे. 


भीमा खोर्‍यातील कमी पावसामुळे हा महाकाय प्रकल्प यंदा हळूहळू भरत गेला. ता राज्यातील सर्व धरणांच्या पाणी टक्केवारीची सरासरी ओलांडली असताना राज्यातील सर्व मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्या सरासरी 98.60 टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे.  उजनी धरण 110 टक्के भरता येवू शकते. सध्या हा प्रकल्प शंभर टक्के भरला  आहे. सध्या दौंड येथून उजनीत मिसळणारी पाण्याची आवक जवळपास 8 हजार  क्युसेक इतकी आहे. याच बरोबर मागील दोन दिवस पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे उजनी वधारली आहे. रोज धरण किमान एक टक्का वधारत असल्याने पुढील काही दिवसात याची वाटचाल क्षमतेने म्हणजे 110 टक्के भरण्याकडे सुरू होईल.


राज्यात भीमा व नीरा खोरे वगळता अन्यत्र जोरदार पाऊस झाला असल्याने धरणं भरून ओसंडून वाहत आहेत. विसर्ग मोठ्या प्रमाणात सोडले जात आहेत. मात्र यंदा उजनी हळूहळू भरले असून यातून पाण्याचा विसर्ग हे धरण 110 टक्के भरल्यावरच शक्य आहे. कोयना, राधानगरी, दूधगंगा, मुळशी, माजलगाव, येलदरी, तेरणा, मांजरा, भंडारधरा, पैठण नाथसागर, भंडारदरा,  मुळा, निम्न वर्धा यासह सीना कोळगाव यासारखे प्रकल्प भरले आहेत. पुणे विभागातील 35 धरणांमध्ये सरासरी 97 टक्के पाणी साठा आहे.   या धरणावर या पावसाळा हंगामात एकूण 470 मिलीमीटर पाऊस झाला आहे. जो गतवर्षीच्या तुलनेत अर्धाही नाही. मागील वर्षी एक हजाराहून अधिक मि.मी. पावसाची नोंद उजनी जलाशयावर झाली होती.