मुंबईः शिवसेना भवनात आज कोकण, रायगड, ठाणे जिल्ह्यातील विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांची शिवसेनेत प्रवेशासाठी मोठी वर्दळ होती. मात्र या कार्यक्रमाला केवळ पंधरा मिनिटे उपस्थिती दर्शवून उद्धव ठाकरेंनी बाकीचे अडीच ते तीन तास पक्षातील प्रमुख मराठा नेत्यांशी मराठा मोर्चांबाबत चर्चा करण्यात घालवले.
उद्धव ठाकरेंनी मराठा मोर्चांच्या हालचालींवर सेनेच्या मराठा मंत्र्यांना लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती आहे. यामध्ये मराठवाड्यातून अर्जुन खोतकर, उत्तर महाराष्ट्र दादा भुसे, विदर्भातून खासदार भावना गवळी आणि मुंबई, ठाणे, कोकणसाठी एकनाथ शिंदे अशी विभागनिहाय जबाबदारी देण्यात आली आहे.
आतापर्यंत निघालेल्या मराठा मोर्चांमध्ये सहभागी झालेल्या नेत्यांकडून मोर्चातील प्रत्यक्ष परिस्थिती उद्धव ठाकरे यांनी जाणून घेतली.
आजच्या बैठकीत मराठा मोर्चांबाबत शिवसेनेने लवकरात लवकर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी या नेत्यांकडून करण्यात आली. मुंबईतला मराठा मोर्चा हा दिवाळीआधी आणि दसऱ्यानंतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना दसरा मेळाव्यात मराठा मोर्चांबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची दाट शक्यता आहे.