जळगाव : दोन कुटुंबांचा वाद सोडवण्यास गेलेल्या माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना जळगावात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 20 जणांना ताब्यात घेतलं आहे.


जळगावातल्या पाचोरा तालुक्यातील परधाडे गावात मिस्त्री आणि धोबी या दोन कुटुंबात गेल्या अनेक दिवसांपासून भांडण सुरू आहेत. सकाळी धोबी कुटुंबानं मिस्त्री कुटुंबावर हल्ला केला. यावेळी मध्यस्तीचा प्रयत्न करणाऱ्या बन्सी पाटील यांच्यावरही चाकूनं वार करण्यात आले. यात पाटील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

प्रकरण काय आहे?

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे गावात मिस्तरी आणि धोबी कुटुंबामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु आहे. काल रात्री देखील या दोन्ही कुटुंबात जोरदार भांडण झाले होते. माजी सरपंच बन्सी पाटील आणि गावातील काही नागरिकांनी काल मध्यस्थी करुन हे भांडण मिटवले होते. त्यानंतर रात्रभर गावात शांतता होती. मात्र धोबी कुटुंबाने सकाळी आपल्या सुरत येथील 20 ते 25 नातेवाईकांना बोलावून मिस्तरी कुटुंबावर हल्ला करण्यास सुरुवात केली. यावेळी देखील मध्यस्थी करण्याच्या प्रयत्न बन्सी पाटील यांनी केला. मात्र संतप्त झालेल्या धोबी कुटुंबातील नातेवाईकांनी चाकूने बन्सी पाटील यांच्यावर प्राणघातक हला करून त्यांना गंभीर जखमी केले.

या घटनेत बन्सी पाटील यांच्यासह पाच जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी या घटनेसंदर्भात सुरतेहून हल्ला करण्यासाठी आलेल्या वीस जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम पाचोरा पोलीस स्थानकामध्ये आता सुरु करण्यात आले आहे.