लातूर : लातूर जिल्ह्यातील उदगीरच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांनी विजय दवणे या मनी ट्रान्सफर एजेंटच्या खात्यातून पैसे बदलून दिले, असा आरोप काँग्रेसचे माजी आमदार चंद्रशेखर भोसले यांनी केला आहे.


यासाठी भोसले यांनी बँकेला घेराव घातला असून बँक कर्मचारी आणि विजय दवणेला अटक करण्याची मागणी केली आहे. गुन्हा दाखल झाल्याशिवाय बँक सोडणार नाही, असं चंद्रशेखर भोसले यांनी सांगितलं आहे.

नियमबाह्य 19 लाख बदलले, 4 बँक कर्मचारी निलंबित


उदगीरच्या बँक ऑफ महाराष्ट्रमधील विकास कदम या कॅशियरसोबत 3 कॅशियर्स निलंबित करण्यात आले आहेत. एका व्यापाऱ्याला पैसे बदलण्यासाठी डमी खातेदार उभा करुन 19 लाखांची रक्कम बदलण्यात आली आहे. 19 लाख रुपये नियमबाह्य पद्धतीनं बदलून दिले म्हणून बँक ऑफ़ महाराष्ट्रच्या मुख्यशाखेनं ही कारवाई केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर रिझर्व बँकेसह आयकर खात्यानंही देशभरात होणाऱ्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवलं आहे. दरम्यान देशभरात समोर आलेला हा पहिलाच प्रकार असल्याचंही बोललं जात आहे.