नोटबंदीनं महाबळेश्वरचा पर्यटन व्यवसायही गारठला!
एबीपी माझा वेब टीम | 22 Nov 2016 05:27 PM (IST)
महाबळेश्वर: पाचशे आणि एक हजारच्या नोटा बंद झाल्यानंतर छोट्यामोठ्या व्यावसायिकांवर खूप मोठा परिणाम झाला. पर्यटनक्षेत्रही याला अपवाद नाही. थंडीच्या दिवसात महाबळेश्वरमध्ये होणाऱ्या गर्दीत यंदा लक्षणीय घट झाली आहे. त्यामागचं कारण आहे मोदींनी घेतलेला नोटबंदीचा निर्णय. गुलाबी थंडीचा मखमली आनंद घेण्यासाठी लोक महाराष्ट्राच्या मिनी काश्मीरची वाट धरतात. पण नोटबंदीच्या निर्णयाचा फटका बसल्यानं महाबळेश्वरचं पर्यटनही थंडगार होऊन गेलं आहे. नोटबंदी जरी असली तरी काही पर्यटक महाबळेश्वरमध्ये आले. पण पाचशे आणि हजारच्या नोटबंदीचा फटका त्यांनाही बसला. जोपर्यंत सुट्ट्या पैशांचं चलन बाजारात मुबलक प्रमाणात येत नाही, तोपर्यंत तरी नोटबंदीचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोदींचे ५० दिवस पूर्ण होईपर्यंत तरी पर्यटन व्यवसाय ही महाबळेश्वरच्या वातावरणाप्रमाणेच थंड राहिले, तर आश्चर्य वाटायला नको.