सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने सर्वपक्षीय नेते एकाच व्यासपीठावर आले. महत्त्वाची बाब म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे दिग्गज नेते नारायण राणे एकाच मंचावर तब्बल 12 वर्षांनी एकत्र आले. यावेळी माझे पूर्वीचे सहकारी म्हणत भाषणामध्ये उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंचा उल्लेख केला.
या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची आठवण आल्याचं सांगितलं. बाळासाहेबांचे कोकणावर किती प्रेम होतं हे सांगायची गरज नाही कोकणावर त्यांचं किती प्रेम होतं हेही सांगायला नको, मी काही मंत्री नाही, मात्र याआधी अनेक नेत्यांनी कोकणाचा कॅलिफोर्निया करु अशी घोषणा केली होती. मात्र त्यांच्या पदरात काय पडलं माहित नाही, असं म्हणत नारायण राणेंना खोचक टोलाही लगावला.
मुंबई आणि कोकण काही वेगळं नाही, आंगणेवाडीला, जत्रांना नवसाला कोकणवासिय आज येतात, उद्या मुंबईला जातात येतात, आता या नव्या रस्त्यामुळे त्यांचा प्रवास आणखी चांगला होईल असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सर्वात वेगवान कामं करणारे मंत्री आहेत असं म्हणंत उद्धव ठाकरेंनी गडकरींचं कौतुक केलं. जशी आपली रक्तवाहिनी असते तसेच रस्ते आणि रेल्वे असतात असं उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले. माझ्या कोकणाला समुद्र किनारे आहेत, किल्ले आहेत ही ओळख आहे, सिंधुदुर्ग किल्ल्यामुळे जिल्ह्याला नवीन ओळख मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसंच रस्ते आणि जलमार्ग आल्यावर कोकण देशातलं नंबर एकचं पर्यटन केंद्र होईल असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
माझे पूर्वीचे सहकारी नारायण राणे आज वेगळे झालेत. एकाच छताखाली वेगवेगळ्या घोषणा देतो पण विकासासाठी एकत्र आलो याचं समाधान आहे. विकासाच्या आड राजकारण येता कामा नये, राजकारण राजकारणाच्या दिशेला असावं म्हणत उद्धव ठाकरेंनी राणेंच्या व्यक्तव्याला दुजोरा दिला. कोकणाचा विकास करतानाच इथल्या तरुणांना उद्योगांचं प्रशिक्षण दिलं पाहिजे, नाहीतर कोकणाचा विकास होईल आणि उपरे येऊन काम मिळवतील. त्यानंतर हा विकास नेमका कुणासाठी असा प्रश्न निर्माण व्हायला नको, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी उद्योगांवर आधारित अभ्यासक्रम कोकणात सुरु करण्याचं सुतोवाच केलं.
आज कुडाळमध्ये झालेल्या या कार्यक्रमात नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचं स्वागत केलं. आधी राणेंनी गडकरींच्या स्वागतासाठी बॅनरबाजी केली. ज्यातून काँग्रेसचा हात गायब होता. मात्र राणे एवढ्यावरच थांबले नाहीत तर कुडाळच्या कार्यक्रमात त्यांनी थेट नरेंद्र आणि देवेंद्र सरकारचं तोंडभरुन कौतुक केलं.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
मी गडकरींच कौतुक करतो, जे बाळासाहेबांच स्वप्न होतं, प्रत्येकाच स्वप्न होतं ते क़ाम आज पुर्ण होत आहे. विकासाचा महामार्ग तयार झाला की रोजगार, पर्यटन सुरु होते समृद्धी येते, असं मुख्यमंत्री म्हणाले.
गडकरी साहेबांनी राज्य रस्त्याच्या जाळयांनी जोडलंय. केंद्र सरकारचे पैसे, राज्य सरकारचे पैसे देऊन आम्ही कोकणाला पर्यटन उभं करतोय, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
उद्योग आणि रोजगाराला इकडे चालना मिळणार आहे, कोकणावर सर्वांचे प्रेम आहे. परिवर्तन झाले पहिजे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राणेंच्या व्यक्तव्याला दुजोरा दिला. विकासाच्या आड़ राजकारण येता कामा नये. फाईव्ह स्टार हॉटेल झालं तर विदेशी लोक येतील, त्यामुळे मी शब्द देतो, की कोकणाच्या पाठीशी उभा राहीन असं मुख्यमंत्री म्हणाले