सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने सर्वपक्षीय नेते एकाच व्यासपीठावर आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे दिग्गज नेते नारायण राणे एकाच मंचावर तब्बल 12 वर्षांनी एकत्र आले, तर दुसरीकडे, राणेंनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली. त्यामुळे राणे भाजपच्या वाटेवर आहेत का, असा सवाल उपस्थित झाला. विशेष म्हणजे नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचं स्वागत केलं.


आधी राणेंनी गडकरींच्या स्वागतासाठी बॅनरबाजी केली. ज्यातून काँग्रेसचा हात गायब होता. मात्र राणे एवढ्यावरच थांबले नाहीत तर कुडाळच्या कार्यक्रमात त्यांनी थेट नरेंद्र आणि देवेंद्र सरकारचं तोंडभरुन कौतुक केलं.

गडकरींवर स्तुतिसुमनं

राज्यात देवेंद्र आणि केंद्रात नरेन्द्र विकासासाठी प्रयत्न करत आहेत. विकासाच्या आड राजकारण येता कामा नये. जिथे विकास आहे, तिथे पक्षीय राजकारण करु नये, असं यावेळी नारायण राणे म्हणाले. नितीन गडकरी यांना विकासपुरुष संबोधून राणेंनी षटकार मारला. विकास आणि राजकारण यात भावना आड यायला नकोत, असंही राणे म्हणाले.

उद्धव-रश्मी ठाकरेंचं राणेंकडून स्वागत

एरवी शिवसेनेवर अतिशय कडवट शब्दात टीका करणाऱ्या राणेंनी भाषणात मात्र उद्धव यांचं आदरानं नाव घेऊन राजकीय संकेत पाळला. कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचं नाव घेणं ही महाराष्ट्रांची संस्कृती आहे. उद्धव ठाकरेंवर टीका करताना कधीही एकेरी उल्लेख केला नाही, असंही राणे आवर्जून म्हणाले. नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचं स्वागत केलं.

राणेंना भाजपकडून पहिल्या रांगेत स्थान

नारायण राणे यांना व्यासपीठावर पहिल्या रांगेत स्थान देण्यात आलं होतं. राणेंना व्यासपीठावर दुय्यम स्थान दिलं जाईल, असं 'एबीपी माझा'शी बोलताना शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी सांगितलं होतं. मात्र भाजपकडून राणेंना पहिल्या रांगेत स्थान दिल गेलं. त्यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं.

आठवलेंची कोपरखळी

नारायण राणे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर आल्यामुळे कविता करण्याची संधी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सोडली. यमक जुळवत राणे-उद्धव एकत्र येण्यावर आठवलेंनी खुसखुशीत कविता सादर केली.

आता होणार आहे मुंबई गोव्याला जाणे,
इकडे एकत्र आले आहेत उद्धव ठाकरे आणि नारायण राणे

भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुरेश प्रभु, रामदास आठवले, अनंत गिते, उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, नारायण राणे, चंद्रकांत दादा पाटील, दीपक केसरकर, रामदास कदम, रविंद्र चव्हाण, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची उपस्थिती होती.

भूमिपूजनाचा कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर राणे समर्थकही आक्रमक झाले आणि त्यांनीही घोषणाबाजी केली. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर कार्यकर्त्यांना शांत करण्यात आलं. पोलिसांनी अनुचित घटना टाळण्यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्ष दत्ता सामंतांना ताब्यात घेतलं.

कुडाळच्या बस डेपो मैदानावर हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमासाठी 400 हून अधिक पोलिस तैनात करण्यात आले होते.

राणेंच्या पोस्टरवर मुख्यमंत्री आणि गडकरी

कार्यक्रमाच्या निमित्ताने काँग्रेस आणि शिवसेनेकडून जोरदार पोस्टरबाजी झाली. मात्र राणेंच्या पोस्टरवर
काँग्रेसचा उल्लेख नसल्यामुळे पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. राणेंच्या पोस्टरवर मुख्यमंत्री आणि गडकरी यांचे फोटो झळकत आहेत.

संबंधित बातम्या :


गडकरींवर स्तुतिसुमनं, नारायण राणे भाजपच्या वाटेवर?


राणेंच्या पोस्टरवर मुख्यमंत्री आणि गडकरी


उद्धव ठाकरे आणि नारायण राणे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर!