मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नियोजित 24 नोव्हेंबरला होणारा अयोध्या दौरा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात सत्तास्थापनेसाठी सुरु असलेले प्रयत्न, यामुळे उद्धव ठाकरे यांनी दौरा पुढे ढकलल्याची माहिती आहे. पुढचा दौरा कधी असेल याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. अयोध्या खटल्याच्या निकालानंतर गेल्या वर्षीप्रमाणे अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा उद्धव यांनी केली होती. शिवसेनेच्या खासदारांना घेऊन उद्धव ठाकरे रामलल्लाच्या दर्शनासाठी जाणार होते. मात्र राज्यातल्या सत्तास्थापनेच्या पेचामुळे उद्धव ठाकरेंचा नियोजित दौरा पुढे ढकलला आहे.


याशिवाय संवेदनशील मानल्या जाणाऱ्या अयोध्या प्रकरणाचा निकाल लागून काही दिवसच झाले आहे. त्यामुळे अयोध्या दौऱ्यासाठी काही कायदेशीर अडचणी असल्याचीही माहिती समोर येत आहे. मात्र पुढील दौरा आखला जाईल त्यावेळी उद्धव ठाकरे सर्व खासदार-आमदार आणि मंत्रिमंडळ घेऊन जातील, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र त्यांची तारीख अद्याप घोषित झालेली नाही. राज्यात सत्तास्थापन झाल्यानंतर पुढील अयोध्या दौरा होईल, असं बोललं जात आहे.



अयोध्या निकालानंतर काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?


अयोध्येचा निकाल लागल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण उद्धव ठाकरेंनी काढली होती. अयोध्येचा प्रश्न संपूर्ण देशभर घेऊन जाणाऱ्या लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांचीदेखील आठवण उद्धव ठाकरेंनी काढली होती. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मी आणि हजारो शिवसैनिक आयोध्येला गेलो होतो. सोबत शिवनेरी किल्ल्यावरची मूठभर माती घेऊन गेलो होतो. ती माती अयोध्येत ठेवून आलो. या मातीती एक शक्ती आहे. एका वर्षातच या मातीमुळे चमत्कार घडला आहे. येत्या 24 तारखेला मी पुन्हा अयोध्येला जाणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचीही भेट घेणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.