नागपूर : अयोध्या प्रकरणी काही लोकं पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, त्यांना याचिका दाखल करुन काहीच मिळणार नाही. अशा नेत्यांना मुस्लिम समाजचं नाकारेल. सामान्य मुस्लिम अशा मुस्लिम नेत्यांमुळे त्रस्त झाला आहे, असे वक्तव्य भारतीय पुरातत्व विभागाचे माजी संचालक पद्मश्री के. के. मोहम्मद यांनी केले आहे. ते नागपुरात आयोजित मंथन मासिक व्याख्यान कार्यक्रमात बोलत होते. मोहम्मद यांनी 1978 मध्येच अयोध्येत झालेल्या उत्खननाच्या कामात प्रशिक्षणार्थी पुरातत्व अधिकारी म्हणून काम केले होते.


यावेळी बोलताना ते म्हणाले की,  मान्य करा किंवा नाही मात्र, काही चुका प्राचीन काळी झाल्या आहेत. अफगाणिस्तानसारख्या देशातून आलेल्या मोहम्मद गजनी, मोहम्मद गोरीसारख्या हल्लेखोरांनी अनेक मंदिर तोडली. या ऐतिहासिक चुका मान्य केल्या पाहिजे आणि त्यांना योग्य ठरवण्याचा प्रयत्न करू नये, असेही मोहम्मद म्हणाले. तसेच त्या चुकांसाठी आताचे मुसलमान जबाबदार नाहीत. मात्र आताच्या मुस्लिमांनी सुद्धा इतिहासात मंदिरे तोडणाऱ्यांची बाजू घेऊ नये, असेही ते म्हणाले.

अयोध्येत 1978 च्या काळात केलेल्या उत्खननात मंदिराचे अवशेष सापडले होते. मात्र, ते सत्य समोर आणले गेले नव्हते. 1990 च्या काळात काही डाव्या इतिहासकारांनी जाणून बुजून अयोध्येत पुरातत्व विभागाला उत्खननात मंदिराचे कोणतेच पुरावे मिळाले नाही, असे सांगितले. त्यानंतर हे प्रकरण वादाचे कारण बनले आणि माझ्यासारख्या अधिकाऱ्याला समोर येऊन तिथे मंदिर असल्याचे पुरावे असल्याचे म्हणावे लागले. आम्हाला तर 12 स्तंभ मिळाले होते. नंतरच्या काळात न्यायालयाच्या निर्देशानुसार झालेल्या उत्खननात 50 पेक्षा जास्त स्तंभ आणि विवादित जागी मोठे राम मंदिर असल्याचे शिलालेखही मिळाले, असे के. के मोहम्मद म्हणाले.

मोहम्मद म्हणाले की, नंतर न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे झालेल्या जीपीएस ( ग्राउंड पेनिट्रेटिंग सर्व्हे ) मध्येही मशिदीच्या खाली मोठे प्राचीन इमारतीचे अवशेष असल्याचे समोर आले. जसे मुस्लिमांसाठी मक्का मदिनासारखी धार्मिक स्थळं महत्वाचे आहेत. तसेच हिंदूंसाठी अयोध्येतील राम मंदिर महत्वाचे आहे, असेही ते म्हणाले.

अनेक मुस्लिम आधीच या वादग्रस्त स्थळावर दावा सोडून ते हिंदूंना देऊ इच्छित होते. मात्र डाव्या विचारसरणीच्या अनेक इतिहासकार आणि बुद्धिवंतांनी लोकांना भ्रमित करत वाद कायम ठेवले. पुरातत्व विभागाच्या रिपोर्टच्या आधारावरच सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिले आहेत. न्यायालयाने या प्रकरणात दिलेले निर्णय उत्कृष्ट निर्णय आहेत त्यापेक्षा अचूक निर्णय होऊच शकत नव्हते, असेही मोहम्मद यांनी सांगितले.