सातारा : 'तान्हाजी ' चित्रपट आता नविन वादाच्या भोव-यात अडकताना पहायला मिळत असून तानाजी मालुसरे यांचा चुकिचा इतिहास सांगितला गेल्याची खंत त्यांच्या जन्म गावातून होताना पाहयाला मिळत आहे. त्यांच्या या वादातून त्यांच्या मुळ गावात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.


डोंगराच्या कुशीत वसलेल्या गोडवली गावात जेमतेम 450 घर आहेत. गावातली लोकसंख्या 2200 च्या आसपास आहे. गावातला इतिहास सांगण्याचं कारण म्हणजे तानाजी मालुसरे यांच जन्म गाव आहे. गावाचा इतिहास पुस्तकात सांगितला गेला असला तरी चित्रपटातून मात्र तानाजी मालुसरे यांचे गाव उंबरट म्हणून दाखवल गेल आहे. तानाजी मालुसरे यांच्या जन्मगावाचा उल्लेख कोठेच न केल्यानं गाव संतप्त आहे.


तानाजींचे वडील काळोजी मालुसरे हे मुळचे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालूक्यातील गोडवली गावातील आहे. मुघलांनी जेंव्हा साता-यातील पसरणी घाट्याच्या माथ्यावर धुमाकूळ घातला तेंव्हा तानाजी मालुसरेंचे वडिल काळोजी लढताना मारले गेले. काळोजी मारल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. तानाजींचे मामा शेलार मामा यांनी मुघलांच्या भितीने गोडवली गाठले आणि काळोजींची पत्नी पार्वती, दोन मुल तानाजी आणि सूर्याजी या तिघांना घेऊन त्यांनी त्यांचे रायगड जिल्हातील कुडपन गाव गाठले. काळोजींच्या कुंटूंबावर मोगलांचा डोळा होता. मारेकरी कुडपनला पोहचतील या भितीपोटी शेलार मामांनी मालूसरे यांचे संपुर्ण कुटूंबाचे बस्तान हलवले आणि त्यांनी स्वत:च्या सासरवाडीत म्हणजे कुडपन गावापासून काही कोसावर असलेल्या उंबरट या गावात हलवले. चार वर्षाचे तानाजी आणि दोन वर्षाचे सूर्याजी हे उंबरट गावातच वाढले आणि तानाजी मालूसरे यांचे गाव उंबरट असेच सांगितले जाऊ लागले.


Satara | तानाजी चित्रपटातून चुकीचा इतिहास मांडला; तानाजी मालुसरेंच्या गावकऱ्यांचा आरोप | ABP Majha



तानाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजीराजेंना जाऊन मिळाले आणि नंतरचा शिवरायांसोबतचा तानाजींचा इतिहास घडला. तानाजी मालुसरे यांच्या जीवनपटावर जो काही चित्रपट सध्या प्रदर्शित झाला त्यात चित्रपटात मात्र तानाजी मालुसरे यांचे जन्म गाव असलेल्या गोडवली या गावचा कोठेच उल्लेख केला गेला नाही. त्यामुळे तानाजी मालुसरे यांची भाऊबंदकी मात्र या चित्रपटावर नाराज असून त्यांनी या बाबत राग व्यक्त केला आहे.


चित्रपटातून तानाजी मालुसरे यांचा र्धवट दाखवलेल्या इतिहासामुळे आम्ही नाराज आहोत. आम्ही तानाजी मालूसरे यांच्या गावातील असल्याचा सार्थ अभिमान असल्याच मत गावातील युवक युवती सांगत आहे.


ग्रामस्थ मंडळी सध्या चित्रपट निर्मात्यांना भेटण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांची भेट झालेली नाही. त्यामुळे शब्दातून राग व्यक्त करणारी ही ग्रामस्थ मंडळी 26 जानेवारीला चित्रपट निर्मात्यांविरोधात निषेधाचा ठराव करणार आहेत. शिवाय यापेक्षा उग्र भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आता निर्माते नेमकी काय भूमिका घेतात? याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.