मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या सात मार्च रोजी पुन्हा एकदा अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत, याबाबतची माहिती शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. महाराष्ट्र सरकारच्या 100 दिवसपूर्तीला उद्धव ठाकरे अयोध्येत जाऊन श्रीरामाचं दर्शन घेणार होते, पण उद्धव ठाकरे आता सात मार्च अयोध्येला जाणार आहेत अशी माहिती राऊत यांनी दिली आहे.


उद्धव ठाकरेंचा अयोध्येचा संपूर्ण कार्यक्रम ठरला असल्याचंही राऊतांनी सांगितलं आहे. तिथे ते रामल्लाचं दर्शन करतील आणि शरयूची तीरावर आरती करतील. या कार्यक्रमाठी हजारो शिवसैनिक देशभरातून येणार असल्याचं संजय राऊतांनी सांगितलं.

“काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राममंदिराच्या निकालाचं स्वागत केलं होतं. त्यामुळे सल्ले देणाऱ्यांनी आधी माहिती घ्यावी आणि नंतर बोलावं,” असं उत्तर संजय राऊतांनी विचारलेल्या प्रश्नाला देताना म्हणाले.

Sanjay Raut | महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांनीही अयोध्येला यावं : संजय राऊत | ABP Majha



गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला मोठं यश मिळालं होतं. महाराष्ट्रातील 48 जागांपैकी भाजपने 23 तर शिवसेनेने 18 जागा जिंकल्या. त्यानंतर उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर गेले होते. 15 जून 2019 रोजी उद्धव यांचा अयोध्या दौरा पार पडला.

त्याअगोदर 25 नोव्हेंबर 2018 रोजी उद्धव ठाकरे अयोध्येला गेले होते. लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु करण्यापूर्वी उद्धव यांनी या दौऱ्याचे आयोजन केले होते. राम मंदिर हा शिवसेना-भाजप युतीचा लोकसभा निवडणुकीपूर्वीचा महत्त्वाचा अजेंडा होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर गेले होते.