बीड : बीडमधील एका रस्त्याच्या कामाचं आज चौथ्यांदा उद्घाटन होणार आहे. अंबाजोगाई-परळी रस्त्यावर गेल्या काही वर्षांपासून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्याच रस्त्याचं आज चौथ्यांदा उद्घाटन होणार आहे. सामाजिक न्याय मंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करणार आहे.

तत्कालिन पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते अंबाजोगाई-परळी रस्त्याच्या कामाचे उद्घाटन यापूर्वी एकदा झाले आहे. तर दोनदा कॉन्ट्रॅक्टरकडूनही शुभारंभ झाला आहे. मात्र त्यांच्या कार्यकाळात या रस्त्याचे काम पूर्ण झालं नाही. अखेर पुन्हा एकदा या कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते या कामाचा पहिल्यांदाच शुभारंभ होतोय.

केंद्रातले सरकार बदलल्यावर बीड जिल्ह्याला नवीन राष्ट्रीय महामार्ग मिळाले. यामध्ये परळी अंबाजोगाईला जोडणारा परळी पिंपळा धायगुडा असा 18.3 किलोमीटरचा महामार्ग देण्यात आला. पूर्वीचा राज्य रस्ता क्र.64 आताचा 548 - ब राष्ट्रीय महामार्ग परळी-पिंपळा (धायगुडा) या रस्त्याचे कामाची सुरुवात गेल्या वर्षी सुरु झाले होते.18.3 किमीच्या रस्त्यासाठी 134 कोटी 45 लाख इतक्या किमतीचे हे काम होते. हे काम 24 महिन्यात पूर्ण करायचे होते.

State News | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा | बातम्या सुपरफास्ट | ABP Majha



सन जून 2016 रोजी या रस्त्याचे टेंडर पास झाले. मात्र प्रत्यक्षात कामाला सप्टेंबर 2017 ला सुरुवात झाली. मात्र आजतागायत या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. या रस्त्यासाठी परळीतल्या नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन केले त्यात 80 जणांवर गुन्हे देखील दाखल आहेत.

यारस्त्याचे काम पूर्ण न झाल्याने केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना माफी मागण्याची नामुष्की लोकसभा निवडणुकीच्या आधी आली होती. इतके होऊनही 2020 उजाडले तरी परळी पिंपळा रस्त्याचे काम अद्याप अपूर्णच आहे. या रस्त्यामुळे शहरात प्रदूषण वाढले आहे. शिवाय अनेक अपघात झाले आहेत.

या रस्ता परभणी लातूर अशा महत्त्वपूर्ण गावांना जोडतो. रस्त्याच्या कामामुळे या गावांच्या अनेक फेऱ्या एसटी महामंडळाने रद्द केल्या आहेत. आता हे काम एका नवीन कंपनीला टेंडर करुन दिल्याची माहिती मिळाली असून हे टेंडर 100 कोटींचे आहे.
दरम्यान याच रस्त्यावरुन धनंजय मुंडे यांनी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांच्यावर आरोप केले होते. आता धनंजय मुंडे स्वतः ज्यावेळी या रस्त्याचं उद्घाटन करत आहेत त्यावेळी या रस्त्याचे काम पूर्ण कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.