जालना : जालना येथे दुष्काळ पाहणीसाठी आलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दुष्काळ दौऱ्यात रस्त्याच्या कामाचे उद्घाटन उरकून घेतले. त्यातच उत्साही कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आणि बॅनर लावून स्वागत केल्याचा प्रकार देखील उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात पाहायला मिळाला.

अर्जुन खोतकरांच्या हस्ते वाटण्यात येणाऱ्या पाण्याच्या टँकरचे उद्धव ठाकरे यांनी उद्घाटन केले. यानंतर जिल्ह्यातील साळेगाव येथे चारा छावणीला भेट देताना उद्धव ठाकरे यांनी रस्त्यात याच गावच्या रस्त्याचे उद्घाटन देखील केले. विशेष म्हणजे चारा छावणीच्या रस्त्यावर शिवसेना कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी देखील केली.

आज सकाळी उद्धव ठाकरे यांचं हेलिकॉप्टरने जालन्यात आगमन झाले. मराठवाडा दौऱ्यात अर्जुन खोतकर यांच्या घरी चहापान केले. त्यानंतर त्यांच्या हस्ते पाण्याच्या टँकरचे उद्घाटन आणि रस्त्याच्या कामाचे उद्घाटन झाले.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्याच्यावरती माझं घर चालतय तो शेतकरी संकटात आहे. अंबाबाईला प्रार्थना केली लवकरात लवकर दुष्काळ संपू दे. अजून पावसाळा सुरू झालेला नाही. पाऊस पडला तर लगेच चारा उपलब्ध होणार नाही म्हणून ही मदत आहे, असे ते म्हणाले.  मराठवाड्यात दुष्काळ संपेपर्यंत मराठवाड्याच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी असू असे वचन देतो, असेही ते म्हणाले.

दुष्काळ पुढच्या पिढीला पाहू देणार नाही, तो कायमचा संपवून टाकू. कर्जासाठी ज्या बँका शेतकऱ्यांची अडवणूक करत असतील त्यांना कोणत्याही मार्गाने सरळ करा हे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे, जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. आता  जर त्यांनी काही नाही केले तर शिवसेना आपल्या पद्धतीने पाहून घेईल, असेही ठाकरे म्हणाले.  जो शेतकऱ्यांना आडवेल त्याला शिवसैनिक सरळ करेल, असे ते म्हणाले.